शिरोली (पुलाची) प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा परिषद मूल्यमापनात जिल्ह्यात प्रथम

Spread the love

     पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे 

शिरोली पुलाची प्राथमिक आरोग्य केंद्राचा जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वार्षिक मूल्यमापनात जिल्ह्यात प्रथम क्रमांक तर सांगली,सिंधुदुर्ग,रत्नागिरी व कोल्हापूर विभाग या चार जिल्ह्यांच्या विभागातही या केंद्राने चौथा क्रमांक पटकावल्याने या यशाबद्दल जिल्हयासह सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.प्रतिकूल परिस्थितीतही उत्तम सेवा शिरोली पुलाची प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत शिरोली, टोप, नागाव, हालोंडी आणि मौजे वडगाव अशा पाच उपकेंद्रांचा समावेश असून, या भागाची एकूण लोकसंख्या सुमारे ६२ हजार आहे. विशेषता शिरोली आणि नागाव उपकेंद्रात शिरोली एमआयडीसी क्षेत्र येत असल्याने, येथे उत्तर भारतीय स्थलांतरित कामगारांची संख्या मोठी आहे. स्वतःची स्वतंत्र इमारत नसतानाही आणि वाढत्या लोकसंख्येचा ताण असतानाही अशा प्रतिकूल परिस्थितीतही उत्तम सेवा रूग्णांना दिलेली सेवा कौतुकास्पद ठरली आहे.जिल्हा परिषदेकडून मूल्यमापन करताना बाह्य रुग्ण विभाग (OPD), आंतररुग्ण विभाग (IPD), प्रसूती विभाग आणि राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी या निकषांवर तपासणी करण्यात आली.दररोज सरासरी १५० ते २०० रुग्णांची तपासणी केली जाते. सोमवार सुट्टीच्या दिवशी हा आकडा ३०० च्या पार जातो . केंद्रात दरमहा सरासरी १२ ते १४ यशस्वी प्रसूती केल्या जातात. दर शुक्रवारी गरोदर मातांची तपासणी आणि नेत्र तपासणी यांसारखे उपक्रम राबवले जातात. या मिळालेल्या यशात वैद्यकीय अधिकारी डॉ. जेसिका अँड्र्यूज व डॉ. विंदा बनसोडे यांचे योग्य नियोजन व मार्गदर्शन लाभले. तसेच तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दातार, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी, स्थानिक ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी आणि आरोग्य केंद्रातील सर्व समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, सेविका, आणि आशा स्वयंसेविका यांनी घेतलेले परिश्रम या यशाचा मुख्य आधार ठरले आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!