राजापूर बंधाऱ्यावर बंदुकधारी पोलीस बंदोबस्त व सीसीटीव्ही कॅमेरे बसवा – बंडू पाटील 

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी

कृष्णा नदीवरील राजापूर (खिद्रापूर) बंधाऱ्याच्या पाण्याचे नियोजन करावे व ठिकाणी बंदुकधारी पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणी जलप्रेमी सदस्य तथा उपाध्यक्ष स्वाभिमानी युवा आघाडी कोल्हापूर जिल्हा बंडू पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरील राजापूर (खिद्रापूर) येथे कृष्णा नदीवरील शेवटचा बंधारा असून शिरोळ तालुक्यातील शेतीच्या पाण्याचे संपूर्ण नियोजन या बंधाऱ्यावर अवलंबून आहे.या बंधाऱ्याच्या पुढे कर्नाटक राज्यात हिप्परगी बराज आहे. अलीकडेच या बॅरेजचा दरवाजा तुटल्याने तेथील साठवलेले पाणी पूर्णपणे वाहून गेले आहे. परिणामी सध्या बराज रिकामा असून त्या भागात पाण्याची तीव्र कमतरता जाणवत आहे.हिप्परगी बॅरेजमध्ये साठवलेले पाणी शिरोळ बंधाऱ्याच्या पायथ्यापर्यंत मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत बॅक वॉटर स्वरूपात उपलब्ध होत होते.त्यानंतर राजापूर बंधाऱ्यास फळ्या घालून तो बंद करण्यात येत असे.मात्र सध्याची परिस्थिती पाहता कर्नाटकात पाण्याची टंचाई वाढल्यास राजापूर बंधाऱ्यावर ताण येण्याची शक्यता आहे.यापूर्वीही कर्नाटकातील काही लोकांनी जेसीबीच्या सहाय्याने राजापूर बंधारा तोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. त्यामुळे अशा प्रकाराची पुनरावृत्ती होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.जर अशी घटना घडली तर कर्नाटकाबरोबरच महाराष्ट्रातील शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण होऊ शकते.आधीच अतिवृष्टी, खारफुटी जमीन यांसारख्या संकटांना सामोरे जावे लागत असताना पाण्याचे नवे संकट निर्माण होऊ नये, यासाठी तातडीने संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेऊन योग्य नियोजन करावे,अशी मागणी करण्यात आली आहे.तसेच बंधाऱ्याच्या परिसरात सीसी कॅमेरे बसवावेत आणि पावसाळा सुरू होईपर्यंत चोवीस तास बंदुकधारी पोलीस बंदोबस्त ठेवावा,अशी मागणी नदीकाठच्या शेतकरी व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. संभाव्य तणाव टाळण्यासाठी प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!