पत्रकार चंद्रकांत भाट यांना ‘शिव प्रेरणा पुरस्कार’ जाहीर

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

छत्रपतींच्या विचारांची प्रेरणा समाजात रुजविणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करण्याच्या उद्देशाने दिला जाणारा यंदाचा मानाचा ‘शिव प्रेरणा पुरस्कार’ शिरोळचे ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत भाट यांना जाहीर करण्यात आला आहे. पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना व परिवर्तन फौंडेशन प्रणीत ‘सर्वधर्मीय जयंती महोत्सव समिती’च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता कोल्हापूर येथील दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज स्मारक भवन येथे आयोजित ‘शिव महोत्सवा’त संपन्न होणार आहे.कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार डॉ.अशोकराव माने (बापू) यांच्या हस्ते होणार असून पँथर आर्मीचे राष्ट्रीय नेते डॉ. राजेंद्रसिंग वालिया हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पँथर आर्मीचे प्रमुख संतोष आठवले असतील.पत्रकार चंद्रकांत भाट गेली वीस वर्षे पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा आणि धार्मिक क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिले आहे. समाजातील सकारात्मक घडामोडींना वाचा फोडत त्यांनी सातत्याने लोकहिताचे प्रश्न मांडले आहेत. त्यांची पत्रकारिता ही केवळ वृत्तांकनापुरती मर्यादित नसून समाजप्रबोधनाची भूमिका निभावणारी आहे. त्यांच्या संवेदनशील लेखनशैलीमुळे आणि सामाजिक बांधिलकीमुळे ते सर्वत्र आदराचे मानकरी ठरले आहेत.भाट हे रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटीचे सक्रिय सदस्य असून राजाराम विद्यालयाच्या शालेय व्यवस्थापन समितीवरही ते कार्यरत आहेत. विविध सामाजिक संस्थांमध्ये पदाधिकारी म्हणून काम करताना त्यांनी युवकांना प्रेरित केले आहे. समाजहिताच्या उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार राहिला आहे. त्यांच्या या सर्वांगीण कार्याची दखल घेत ‘शिव प्रेरणा पुरस्कार’ जाहीर करण्यात आल्याची माहिती समितीचे कार्यवाहक मच्छिंद्र रूईकर यांनी दिली.यावर्षी पत्रकार चंद्रकांत भाट यांच्यासह प्रशासन, समाजसेवा आणि कला क्षेत्रातील १४ मान्यवर व्यक्तींनाही गौरविण्यात येणार आहे. परिवर्तन फौंडेशनचे संस्थापक अमोल कुरणे, चंद्रकांत मुळे, उमेश जामसंडेकर, प्रा. अरुण मेढे, ज्योतीताई झरेकर, लक्ष्मीकांत कुबळे, बबन तांदळे, सौ. छाया सातारकर, नितेश कुमार दिक्षांत (जिल्हा महासचिव), संजय कांबळे (जिल्हा उपाध्यक्ष), राजू मोमीन (हातकणंगले तालुका अध्यक्ष), आनंदा तरटे (करवीर तालुका उपाध्यक्ष), भिकू कांबळे (शिरोळ तालुका अध्यक्ष) यांच्यासह जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व मान्यवर या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत.शिव महोत्सवाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर व्यापक करण्याचा समितीचा प्रयत्न असून, या सोहळ्यास जास्तीत जास्त शिवप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!