पुलाची शिरोली / प्रतिनिधी कुबेर हंकारे
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यासाठी पुलाची शिरोली (ता.हातकणंगले) येथे स्थानिक हिंदुत्ववादी संघटना आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत तीव्र निदर्शने केली.यावेळी सकपाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून संताप व्यक्त करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार परिसरात सायंकाळी सहाच्या सुमारास कार्यकर्ते एकत्र आले.त्यांच्या हातात सकपाळ यांच्या निषेधाचे फलक होते. शिवरायांचा अपमान सहन करणार नाही या सकपाळचं करायचं काय खाली डोकं वर पाय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. कार्यकर्त्यांनी सकपाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारून आपला तीव्र निषेध केला.या जोडे मारो आंदोलन वेळी हातकणंगले तालुका ओबीसी सेलचे अध्यक्ष अर्जुन चौगुले, तंटामुक्त समिती अध्यक्ष सतीश पाटील, डॉक्टर सुभाष पाटील यांनी आपले निषेधपर मनोगत व्यक्त केले.आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले की,टिपू सुलतान यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. अशा विधानांमुळे समाजात असंतोष निर्माण होतो. हर्षवर्धन सकपाळ यांनी याप्रकरणी तातडीने माफी मागावी, अन्यथा यापुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.आंदोलनामुळे शिरोली परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. मात्र, शिरोली एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात ठेवली. प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आणि कायद्याच्या चौकटीत राहून आपली मते मांडण्याचे आवाहन केले आहे.या आंदोलनात हातकणंगले तालुका ओबीसी अध्यक्ष अर्जुन चौगुले, निलेश शिंदे,सतीश पाटील,दिलीप शिरोळे,संभाजी भोसले,डॉ. सुभाष पाटील,संदीप तानवडे,सचिन गायकवाड, धीरज पाटील, राहुल अष्टेकर, सागर मोरे, दीपक रानमाळे, विशाल खोचीकर, सतीश कुंभार, योगेश खाडे,अमित शिंदे,अभिजीत शिंदे, श्रीकांत कदम,ओंकार रंगापुरे, किरण जकाते यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.