कागवाड येथे जटा निर्मूलनाचा यशस्वी उपक्रम; सामाजिक जागृतीचा आदर्श

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

कागवाड (कर्नाटक) येथे आज सामाजिक परिवर्तनाचा महत्त्वपूर्ण बदल घडवून सौ.कमल आण्णाप्पा वाघमोरे या देवदासी मावशींची तब्बल 15 वर्षांपासून वाढत गेलेली जट यशस्वीरित्या काढण्यात आली.सुमारे 6 फूट लांबीची आणि जवळपास 6 किलो वजनाची ही जट काढण्याचे कार्य अत्यंत संयम,काळजी आणि सामाजिक जाणीवेने पूर्ण करण्यात आले.या उपक्रमासाठी राष्ट्र सेवा दलचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि शिरोळ तालुका अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अनिस) चे मार्गदर्शक बाबासाहेब नदाफ यांनी पुढाकार घेतला. शिरोळ तालुका कार्याध्यक्ष खंडेराव हेरवाडे आणि तालुका कार्यवाह सचेतन बनसोडे यांनीही या कार्यात सक्रिय सहभाग नोंदवला. तसेच प्रा. अशोक आलगुंडी (कागवाड) आणि प्रा. संजय माने (कवठे गुलंद) यांचे विशेष सहकार्य लाभले.गडहिंग्लज येथील सेवादल कार्यकर्ते व अनिसचे मार्गदर्शक अरविंद बारदेस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा उपक्रम सामाजिक जागृती आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरला. दीर्घकाळ धार्मिक समजुतींमुळे जपली गेलेली जट काढण्याचा निर्णय हा धाडसाचा आणि नव्या विचारांचा प्रतीक मानला जात आहे.या प्रसंगी सौ. कमल वाघमोरे यांचे पती श्री. आण्णाप्पा वाघमोरे, मुलगी अनिता आनंद बोबडे, नातू ऋत्विक आनंद बोबडे, तसेच नाती कु. गार्गी श्रावण वाघमोरे आणि कु. परी श्रावण वाघमोरे उपस्थित होते. कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळे हा निर्णय अधिक दृढ झाला.जटा निर्मूलन हा केवळ वैयक्तिक बदल नसून सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारा उपक्रम आहे. महिलांच्या आरोग्य, स्वच्छता आणि सन्मानाच्या दृष्टीने अशा उपक्रमांचे मोठे महत्त्व आहे. कागवाड येथे झालेल्या या कार्यामुळे परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, अंधश्रद्धेविरुद्ध लढा अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.समाजप्रबोधनाच्या दिशेने उचललेले हे पाऊल निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!