शिरोळ / प्रतिनिधी
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने गेल्या आठवड्यात झालेल्या विद्यापीठ अंतर्गत संशोधन समितीच्या बैठकीत ‘दत्त पॅटर्न’ क्षारपड जमीन सुधारणा हा प्रकल्प संशोधनासाठी निवडला आहे. त्यानुसार कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रज येथील शास्त्रज्ञ डॉ. श्रीमंत राठोड आणि कृषी महाविद्यालय कोल्हापूर येथील शास्त्रज्ञ डॉ. ऋषिकेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी या पॅटर्नचा अभ्यास करणार आहेत, अशी माहिती श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख, श्री दत्त साखरचे मार्गदर्शक संचालक, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.या संशोधनात्मक अभ्यासामध्ये क्षारपडमुक्तीच्या दत्त पॅटर्न मधील शेतकऱ्यांची वैयक्तिक, शैक्षणिक, शेती विषयक माहिती गोळा करणे, हा पॅटर्न राबवल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनात, त्यांच्या सामाजिक व आर्थिक जीवनावर काय परिणाम झालेला आहे?, शेतकऱ्यांनी त्यांच्या एकूण जमिनीपैकी किती प्रक्षेत्रावर क्षारपड सुधारण्यासाठी सच्छिद्र निचरा प्रणाली आणि रासायनिक, सेंद्रिय भू-सुधारकांद्वारे सुधारणा केली आहे?, हा पॅटर्न राबवताना शेतकऱ्यांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो? आणि त्या सोडविण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत? हा अभ्यास पूर्ण झाल्यावर अभ्यासाचे निष्कर्ष मिळाल्यानंतर सदरील क्षारपडमुक्तीचा दत्त पॅटर्न महाराष्ट्रातील तसेच देशातील क्षारपड ग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रक्षेत्रावर सामुदायिक पद्धतीने राबविण्यासाठी शासनास सादर केला जाईल, अशी माहिती गणपतराव पाटील यांनी दिली.अधिक माहिती देताना गणपतराव पाटील म्हणाले, देशपातळीवर 6.73 दशलक्ष हेक्टर, महाराष्ट्रात सहा लाख हेक्टर तर शिरोळ तालुक्यात दहा हजार हेक्टर वरती जमीन पाणस्थळ आणि क्षारपड झाली आहे. हे प्रमाण प्रतिवर्षी दहा टक्क्यांनी वाढत आहे. दत्त कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांना 2015 साली एकरी शंभर टन ऊस उत्पादन घेण्याचे आवाहन केले होते. पण शेतकरी 50-60 टनापर्यंतही पोहोचले नाहीत. त्यामुळे याचे कारण शोधताना माती परीक्षणातून जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी असल्याचे आणि जमिनी पाणस्थळ व क्षारपड झाल्याचे लक्षात आले. यावर उपाययोजना शोधण्यासाठी शास्त्रज्ञांची बैठक घेऊन, चर्चा करून त्यामधून क्षारपड सुधारणेसाठी पाण्याचा निचरा करणे आवश्यक असल्याचे मत पुढे आले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रजचे शास्त्रज्ञ डॉ. श्रीमंत राठोड आणि केंद्रीय माती क्षारता संशोधन संस्था कर्नाल हरियाणाचे शास्त्रज्ञ डॉ. बुंदेला यांच्या मार्गदर्शनाखाली क्षारपड मुक्तीच्या दत्त पॅटर्नची सुरुवात करण्यात आली. यानुसार बुबनाळ येथे 150 एकरावरती क्षारपड मुक्तीचा प्रकल्प राबविला. त्यानंतर शेडशाळ येथे 900 एकरा वरती प्रकल्प यशस्वी झाला. शेतकऱ्यांची मानसिकता तयार करणे, त्यांना एकत्रित करणे, त्यांच्या सहकारी संस्था स्थापन करणे यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी होत्या. पण या समस्येचे गांभीर्य त्यांना समजावून सांगण्यात आले. जमिनीचे पृथक्करण केल्यानंतर इसी 28 डेसी सायमन पर मीटर होता, तो क्षारपडमुक्ती नंतर 0.6 पासून 2.5 पर्यंत खाली आला आहे. हिरवळीचे खते, देशी खत, पालोपाचोळा जमिनीत गाडल्यामुळे सेंद्रिय कर्ब वाढत असून तो एक टक्क्यापर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे उत्पादन वाढत आहे.या ठिकाणी 40 ते 50 वर्षे पडीक असलेल्या जमिनीवर काही उत्पादन निघत नव्हते, तेथे एकरी 70 ते 80 टन ऊस उत्पादन सुरू झाले. शेतकऱ्यांना जमिनीची शिव, हद्द माहीत नव्हती. शेतकऱ्यांच्या नावावर शेती नव्हती. या अडचणी लक्षात घेऊन तत्कालीन तहसीलदार गजानन गुरव, भूमी अभिलेखच्या सुवर्णा मसणे यांनी खातेफोड करून दिली. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सातबारा वरती पडीक ऐवजी पीकाऊ असा शेरा मारण्याचा आदेश देऊन शेतकऱ्यांची पत निर्माण केली. यामुळे ज्या जमिनीला आठ दहा हजार रुपये एकरी मिळत नव्हते, त्याची किंमत वाढून आज तीस ते पस्तीस लाखापर्यंत गेली आहे. शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था स्थापन करून सर्व कामावर देखरेख करणे, अडचणी सोडवणे, पाईपचे दर ठरविणे अशी सर्व कामे केली जात आहेत. सुरुवातीला एकरी 80 ते 85 हजार रुपये खर्च येत होता, तो आता दीड लाखावर गेला आहे. शेतकऱ्यांना या कामासाठी डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील जयसिंगपूर उदगाव बँक आणि वीरशैव बँकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा उपलब्ध करून देण्यात आला. शेतकऱ्यांनी उत्पादन घेण्यास सुरुवात केल्यानंतर दोन वर्षातच कर्जाची फेड केली आहे. गेल्या अकरा वर्षापासून क्षारपड मुक्तीचे हे काम अविरतपणे सुरू आहे. आगामी काळात जे पाणी नदीत अथवा ओढ्यात सोडले जात आहे, ते एका ठिकाणी साठवून पुन्हा रिसायकलिंग करून वापरात आणले जाणार आहे. यामुळे खत मात्रा सुद्धा पुन्हा वापरता येईल. शेती उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. आज अखेर 24 गावांमध्ये दहा हजार एकरावरती मुख्य पाईपलाईनचे काम झाले असून 4000 एकरा वरती प्रत्यक्ष पिकाचे उत्पादन घेतले जात आहे. राज्यातीलच नव्हे तर देशभर या कामाचा प्रचार झाला असून लोक भेटी देत आहेत. परदेशातही यावर चर्चासत्र होत असून याचा अभ्यास केला जात आहे हे या प्रकल्पाचे यश म्हणावे लागेल. या दत्त पॅटर्नला सरकारचे कॉपीराईट मिळालेले असून आमच्यासाठी हे अभिमानास्पद आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच प्राधान्य देण्याची भूमिका आगामी काळातही राहील, अशी ग्वाही गणपतराव पाटील यांनी यावेळी दिली. कृषी संशोधन केंद्र कसबे डिग्रजचे शास्त्रज्ञ डॉ. श्रीमंत राठोड म्हणाले, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे नूतन कुलगुरू डॉ. विलास खर्चे हे स्वतः मृदा शास्त्रज्ञ असून त्यांनी क्षारपड जमीन सुधारणा मध्ये मोलाचे योगदान दिले आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील क्षारपडमुक्तीच्या दत्त पॅटर्नचा अभ्यास करण्यास त्यांनी सुचित केले. डॉ. ऋषिकेश सोनावणे व विद्यार्थ्याकडून या क्षारपड जमिनीच्या प्रकल्पाचा संशोधनात्मक अभ्यास होणार आहे. या अभ्यासांतर्गत शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांची माहिती गोळा करणे, शेतकऱ्यांचे प्रबोधन करणे, क्षारपड जमीन सुधारणा सहकारी संस्था स्थापन करणे, क्षारपड ग्रस्त गावातील संपूर्ण जमिनीचा सामुदायिक पद्धतीने जमीन सुधारणा कार्यक्रम तयार करणे, लाभार्थी शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा उपलब्ध करून देणे, प्रत्यक्ष अंमलबजावणी करून भूमिगत सच्छिद्र निचरा पद्धत अंतर्गत मुख्य पाईपलाईनचे काम करून ओढा नदीपर्यंत नेणे, तसेच प्रणालीची अंतर्गत अंमलबजावणी करणे, तंत्रज्ञान राबवल्यानंतर रासायनिक भू सुधारकांचा वापर, सेंद्रिय व हिरवळीच्या भू सुधारका बाबत माती परीक्षणानुसार सल्ला देणे आणि पीक लागवड तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन करणे अशा पद्धतीने संशोधनात्मक अभ्यास होणार आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीची सुधारणा वाढून त्यांची सामाजिक व आर्थिक उन्नती होणार असून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य लाभणार असल्याचेही त्यांनी सांगितले.यावेळी कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, सचिव अशोक शिंदे, संचालक इंद्रजीत पाटील, शेखर पाटील, प्रमोद पाटील, मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा, ऊस विकास अधिकारी ए. एस. पाटील, अभियंता कीर्तीवर्धन मरजे उपस्थित होते.