शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ येथील क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे शाहरुख खलिफ यांना ‘महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार 2026’ या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त टॅलेंट कट्टा आणि नालंदा विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान केला जातो. पुणे येथे आयोजित दिमाखदार सोहळ्यात राष्ट्रीय अध्यक्ष तथा मराठी चित्रपट असोसिएशनचे कार्यक्रमाध्यक्ष नितीन धवणे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते शाहरुख खलिफ यांना गौरविण्यात आले.शिरोळसारख्या ग्रामीण भागातून पुढे येत शाहरुख खलिफ यांनी क्रीडा क्षेत्रात सातत्य, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. स्थानिक पातळीवर खेळाडूंना मार्गदर्शन, विविध स्पर्धांचे आयोजन आणि युवकांमध्ये क्रीडाविषयी जागरूकता निर्माण करण्याचे कार्य त्यांनी प्रभावीपणे पार पाडले आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेक तरुणांना प्रेरणा मिळाली असून शिरोळ परिसरात क्रीडा संस्कृतीला नवे बळ मिळाले आहे.पुरस्कार वितरण सोहळ्यास डॉक्टर निला जोशी, डॉक्टर संदीप सांगळे, आर्या घारे, अर्चना देसाई, डॉक्टर राजेंद्रसिंग वालिया तसेच कला व क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी शाहरुख खलिफ यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्यांच्या यशामुळे शिरोळचे नाव राज्यपातळीवर झळकले असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.‘महाराष्ट्र रत्न गौरव पुरस्कार’ प्राप्त झाल्याबद्दल शिरोळ व परिसरातून शाहरुख खलिफ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विविध सामाजिक संस्था, क्रीडा मंडळे आणि नागरिकांनी त्यांचे कौतुक करत हा सन्मान संपूर्ण शिरोळकरांसाठी अभिमानास्पद असल्याचे सांगितले. शाहरुख खलिफ यांचे कार्य भविष्यातही अनेकांना प्रेरणादायी ठरेल आणि ते क्रीडा क्षेत्रात नवे आदर्श निर्माण करतील, असा विश्वास व्यक्त होत आहे.