शिरोळ / प्रतिनिधी
शहरातील दसरा चौक,नदिवेश येथील पेटलेल्या कचरा डेपोची तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाची नगराध्यक्षा सौ.योगिता कांबळे, उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव,नगरसेवक ओंकार गावडे व सचिन शिंदे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून विविध कामकाजाची सविस्तर माहिती घेण्यात आली असून प्रशासन व कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.अलीकडेच कचरा डेपोला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.या घटनेची दखल घेत नगराध्यक्षा व उपनगराध्यक्षांनी तातडीने घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला.भविष्यात अशा घटना घडू नयेत,कचरा साठवणूक व व्यवस्थापन शास्त्रोक्त पद्धतीने व्हावे आणि सुरक्षेच्या उपाययोजना काटेकोरपणे राबवाव्यात,अशा स्पष्ट सूचना प्रशासनाला देण्यात आल्या.त्यांच्या या पाहणीनंतर भविष्यात कचरा पेटण्याच्या घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या जातील,अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे.याशिवाय घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प,सांडपाणी निचरा प्रकल्प तसेच पालिकेमार्फत सुरू असलेल्या विविध विकासकामांनाही पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन कामांची पाहणी केली. तसेच सुरू असलेली कामे वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण व्हावीत, कोणतीही हलगर्जीपणा होऊ नये तसेच नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निराकरण व्हावे, यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचनाही देण्यात आल्या.नगराध्यक्षा योगिता कांबळे व उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ठिसाळ व विस्कळीत कामकाज सुरळीत करण्यावर भर दिला आहे.पारदर्शक कारभार,स्वच्छता आणि गतिमान प्रशासन यासाठी ते आग्रही असल्याचे सध्या शिरोळ शहरात चित्र निर्माण झाले आहे.त्यांच्या पुढाकारामुळे विकासकामांना गती मिळेल,असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.यावेळी पालिकेतील विविध खात्यांचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.