शिरोळ शहर व परिसरात श्री संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा भक्तिभावात संपन्न

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ शहर व परिसरात श्री संत श्रेष्ठ गजानन महाराज प्रकट दिन सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. शहरासह उपनगर आणि ग्रामीण भागातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक कार्यक्रमांमुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.वेदमूर्ती चॅरिटेबल ट्रस्टचे प्रमुख वेदमूर्ती अनिकेत जोशी (महाराज) यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रम्हांडनायक भवन येथे श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा अत्यंत श्रद्धा व भक्तीभावाने पार पडला.या निमित्ताने श्री गजानन विजय ग्रंथाचे पारायण,नामस्मरण,भजन,काकडा आरती असे विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. रविवारी पहाटे श्री गजानन महाराज यांच्या मूर्तीला महाअभिषेक अर्पण करून पूजा व काकडा आरती करण्यात आली. यानंतर श्री गणेश महायज्ञयाग,श्रीचा धावा व अखंड नामस्मरण झाले.दुपारी महाआरतीनंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.या कार्यक्रमास मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.वेदमूर्ती चॅरिटेबल ट्रस्ट तसेच श्री गजानन महाराज भक्त मंडळांच्या कार्यकर्त्यांनी या सोहळ्यासाठी विशेष परिश्रम घेतले.सामाजिक कार्यकर्ते किशोर पाटील रेंदाळकर यांच्या निवासस्थानीही श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा भक्तिभावात संपन्न झाला. येथेही विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.दुपारी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.श्री दत्तनगर येथे सुधाकर शेंडगे यांच्या निवासस्थानी श्री गजानन महाराज प्रकट दिन सोहळा धार्मिक व भक्तिमय वातावरणात पार पडला.महाआरतीनंतर भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.तसेच विजयकुमार माळी यांच्या निवासस्थानीही प्रकट दिन सोहळा साजरा करण्यात आला. सायंकाळी येथेही भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.शिरोळ शहर व परिसरातील अनेक ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या प्रकट दिन सोहळ्यांमुळे सर्वत्र भक्तिमय आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते.भाविकांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदवित श्री संत गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले.

Leave a Comment

error: Content is protected !!