शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ नगरपरिषदेच्या दिनकररावजी यादव सभागृहामध्ये शुक्रवारी मासिक सभेचे आयोजन करण्यात आले. नगराध्यक्षा योगिता कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांच्या उपस्थितीत ही सभा पार पडली. सभेच्या सुरुवातीला दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केलेल्या मान्यवरांचा अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला.यानंतर नगरपालिकेतील विविध विभागांचा विभागनिहाय आढावा घेत असताना उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेत अनेक प्रश्न उपस्थित केले. बायोमेट्रिक हजेरी प्रणाली का वापरली जात नाही, कर्मचाऱ्यांना गणवेश व ओळखपत्रे देण्यात आली आहेत का, मागील पाच वर्षांत किती सर्वसाधारण व विशेष सभा झाल्या, सभांचे प्रोसिडींग पोर्टलवर का अपलोड करण्यात आले नाही, असे सवाल त्यांनी उपस्थित केले.तसेच सर्व दैनिकांत प्रसिद्ध होणाऱ्या टेंडर नोटिसा कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर लावाव्यात, हालचाल रजिस्टर मेंटेन करावे, कामाव्यतिरिक्त अनावश्यक हालचाली होऊ देऊ नयेत, अन्यथा कारवाई केली जाईल, असे स्पष्ट निर्देश दिले. कार्यालयीन वेळापत्रक बोर्डावर लावावे, नागरिकांना कामासाठी हेलपाटे मारायला लावू नये, कर्मचाऱ्यांच्या तीन महिन्यांच्या अॅडव्हान्स पगाराची तरतूद ठेवावी, अशी सूचना त्यांनी केली.कर विभागाचे अधिकारी आशुतोष प्रधाने सभेस अनुपस्थित का होते, याबाबत जाब विचारून त्यांना नोटीस काढण्याचे आदेश देण्यात आले. नगरपालिकेची महत्त्वाची कामे सुरळीत चालण्यासाठी निवडणूक कामातून महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करण्याबाबतही चर्चा झाली. बांधकाम परवाने वेळेत द्यावेत, ऑफलाईन फाईल्स तपासून घ्याव्यात, आवश्यक कागदपत्रांची यादी नागरिकांना उपलब्ध करून द्यावी, तसेच सॉफ्टवेअरविषयक अडचणी सोडवण्यासाठी इंजिनिअर असोसिएशनसोबत बैठक घेण्याच्या सूचना यादव यांनी दिल्या.घंटागाड्यांना जीपीएस प्रणाली सुरू करणे, किती घंटागाड्या सुरू व बंद आहेत याची माहिती देणे, पाणीपुरवठा टँकरची स्थिती, फॉगिंग मशीनची कार्यस्थिती, डीडीटी पावडर फवारणी, शहरातील उघड्यावर साचणाऱ्या कचऱ्याचे ठिकाण निश्चित करून कचरा उठावाचे नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले.नगरपालिकेचे उत्पन्न वाढवणारी साधने बंद पाडू नयेत, पालिकेचे आर्थिक नुकसान करू नये, असे खडेबोलही त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. नगराध्यक्षा योगिता कांबळे यांनी प्रत्येक मिळकतधारकाची अचूक कर आकारणी झाल्याशिवाय चुकीच्या पद्धतीने कर आकारणी करू नये. तिप्पट घरफाळा व शास्तीवसुली नोटिसा तात्पुरत्या स्थगित ठेवून नव्याने फेरसर्व्हे करावा, असे स्पष्ट केले. पाणीपुरवठा, आरोग्य व स्वच्छता विभाग नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित असल्याने आवश्यक साहित्य खरेदी व मनुष्यबळाची मागणी नियमांनुसार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच जॅकवेल व फिल्टर हाऊसमधील गाळ काढण्याबाबत अहवाल तयार करण्याचे आदेश देण्यात आले.सभेस आरोग्य सभापती विजय आरगे, बांधकाम सभापती सौ. अनिता संकपाळ, महिला व बालकल्याण सभापती सौ.कल्पना काळे, शिक्षण सभापती शरद उर्फ बापूसो मोरे यांच्यासह सर्व नगरसेवक,नगरसेविका तसेच नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.