मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा
इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी महानगरपालिकेच्या भाजप महायुतीच्या नूतन नगरसेवक व नगरसेविकांची महत्त्वपूर्ण बैठक आज इचलकरंजी येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.या बैठकीस महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तसेच संसदीय कार्य मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.या बैठकीत इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदासाठी उदय धातुंडे यांची, तर उपमहापौरपदासाठी अनिल डाळ्या यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.यानिमित्ताने उपस्थित सर्व मान्यवरांनी नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांच्या यशस्वी, पारदर्शक व लोकाभिमुख कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.यानंतर भाजप महायुतीचे महापौरपदाचे उमेदवार उदय धातुंडे व उपमहापौरपदाचे उमेदवार अनिल डाळ्या यांनी इचलकरंजी महानगरपालिकेत आमदार राहुल आवाडे व माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आपले उमेदवारी अर्ज अधिकृतरीत्या दाखल केले.या वेळी कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे, सौ. मोश्मी आवाडे, भाजप महायुतीचे प्रमुख पदाधिकारी, भाजप शहराध्यक्ष, महिला आघाडीच्या अध्यक्षा तसेच मोठ्या संख्येने नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.इचलकरंजी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नव्या नेतृत्वाकडून सकारात्मक व गतिमान कारभाराची अपेक्षा व्यक्त करण्यात येत असून, ही निवड शहराच्या राजकीय वाटचालीत एक नवा अध्याय ठरेल, असा विश्वास यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.