शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक,शांततापूर्ण व सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे.तालुक्यातील एकूण २३२ मतदान केंद्रांवर ही निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार आहे.यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी येत्या ७ फेब्रुवारी रोजी मतदान, तर ९ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. जिल्हा परिषदेच्या ७ जागांसाठी २४ उमेदवार, तर पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ४२ उमेदवार निवडणूक रिंगणात असून एकूण ६६ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. उदगाव,आलास,दत्तवाड,अब्दुललाट,यड्राव, नांदणी व दानोळी हे सात जिल्हा परिषद गट असून पंचायत समितीचे एकूण १४ गण आहेत.शिरोळ तालुक्यातील एकूण मतदारसंख्या २ लाख ४० हजार १०२ इतकी असून त्यामध्ये महिला मतदार १ लाख २० हजार ८२७, पुरुष मतदार १ लाख १९ हजार २७३, तर तृतीयपंथी २ मतदार आहेत. निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाने १ हजार १६२ निवडणूक कर्मचारी, २३२ शिपाई व २३२ पोलीस कर्मचारी अशी एकूण १ हजार ६२४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.नियुक्त कर्मचाऱ्यांना दोन वेळा प्रशिक्षण देण्यात आले असून निवडणूक प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.सध्या मतदार यादी अद्ययावत करणे,टपाली मतदानाची प्रक्रिया,मतदान साहित्याचे वाटप तसेच मतमोजणीसाठी लागणाऱ्या साहित्यांची तयारी अंतिम टप्प्यात आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी अर्चना नष्टे, तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार म्हणून अनिलकुमार हेळकर काम पाहत आहेत.प्रशासनाकडून मतदारांनी निर्भयपणे व उत्स्फूर्तपणे मतदान करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.