उदगाव / प्रतिनिधी
उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपच्या प्रचाराला वेग आला असून माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती अनिल उर्फ सावकर मादनाईक यांनी आक्रमक भूमिका घेत स्वच्छ प्रतिमा, प्रामाणिकपणा आणि जनतेशी असलेली नाळ यावर भर दिला आहे.“मी पदावर होतो,विधानसभेला उभा राहिलो; पण कधीही माझी मातीशी नाळ तुटली नाही,” असा ठाम खुलासा करत मादनाईक यांनी उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपच्या तिन्ही उमेदवारांना विजयी करण्याचे जोरदार आवाहन केले.सावकर मादनाईक म्हणाले, “माझा व्यवसाय शेती आहे. त्यामुळे मी आजही दररोज सकाळी सहा वाजता शेतात असतो. शेतातील कामांचा आराखडा लावून मगच राजकारण करतो. सत्ता, पद, गाड्या यांनी मला कधी बदलले नाही.” जिल्हा परिषद सदस्य आणि बांधकाम सभापती असतानाही आपण कधीही गाडीच्या काचा वर करून फिरलो नाही, मोटारसायकलवरूनच उदगाव पिंजून काढले, हे त्यांनी ठासून सांगितले.“मी कधीही कुठल्याही गावातील गायरान जमिनीवर डोळा ठेवला नाही, कुठलाही घोटाळा केला नाही,” असा स्पष्ट दावा करत त्यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांना थेट आव्हान दिले.“२५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत माझ्यावर एकही भ्रष्टाचाराचा डाग नाही. पुढेही कधी लागणार नाही,” असे सांगत त्यांनी स्वतःची स्वच्छ प्रतिमा अधोरेखित केली.ऊस आंदोलन असो वा राजकारण, आपण कधीही कुणाच्या वाळलेल्या पाल्यावर पाय दिला नाही,कपटी राजकारण केले नाही, जातीपातीचे भांडण लावून फायदा घेतला नाही, असे सांगत मादनाईक यांनी समावेशक राजकारणाची भूमिका मांडली.माझ्या मतदारसंघातील सर्व समाजातील लोक मला ओळखतात.मी सर्वसामान्य माणसांसोबत उभा असतो,असे ते म्हणाले.जनतेशी असलेल्या भावनिक नात्यावर बोलताना ते म्हणाले, “आजही अनेक जुने जाणते लोक मला ‘अरे सावकार’ असेच हाक मारतात.माझ्या मतदारसंघातील लोक मला आपल्या मुलासारखे प्रेम करतात.”आपण कधीही कुणाकडून पाया पडून घेतला नाही,उलट हातात हात देऊन भारतीय आलिंगन देतो,“तुमची जागा माझ्या हृदयात आहे,पायात नाही,”असे सांगतो, हे त्यांनी अभिमानाने सांगितले.मीच उमेदवार आहे असे समजून भाजपच्या तिन्ही जागांवर कमळ चिन्हावर मतदान करा.तुमचा विश्वासघात होऊ देणार नाही.कोणत्याही गावातील गायरान जमीन असो किंवा आरक्षणाच्या नावाखाली तुमच्या जमिनीवर अन्याय होऊ देणार नाही. जनतेचा विश्वास आणि भाजपची ताकद याच्या जोरावर उदगाव मतदारसंघात विजय निश्चित असल्याचा आत्मविश्वास मादनाईक यांनी व्यक्त केला.