शिये परिसरात गांजा विक्रीचा पर्दाफाश स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई; १ लाखाचा मुद्देमाल जप्त, तरुणास अटक

Spread the love

पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे

शिये (ता.करवीर) शिये येथील हनुमान नगर परिसरात गांजाची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने रंगेहाथ पकडत त्याच्याकडून सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी अवैध अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करण्यात आली होती.गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांचे पथक गस्त घालत असताना पोलीस अंमलदार रामचंद्र कोळी व महेश आंबी यांना शिये येथील हनुमान नगर परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ एक व्यक्ती गांजाची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पथकाने तत्काळ सापळा रचून संबंधित ठिकाणी छापा टाकला.छाप्यात आरोपी अकबर बादशाह अत्तार (वय २५, मुळगाव – कदमवाडी, कोल्हापूर; सध्या रा. माळवाडी, पुलाची शिरोली, ता. हातकणंगले) याला ताब्यात घेण्यात आले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे १ किलो १६० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. यासह एक स्प्लेंडर प्लस मोटारसायकल, एक मोबाईल हँडसेट व रोख रक्कम असा एकूण १ लाख ३ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धिरजकुमार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. आरोपीविरोधात शिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!