उदगाव जि.प. मतदारसंघाचा कायापालट करण्याचा निर्धार – अमोल चव्हाण

Spread the love

कुटवाड / प्रतिनिधी 

उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी देऊन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व माजी आमदार उल्हास पाटील यांनी दाखवलेला विश्वास सार्थ करून उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचा सर्वांगीण कायापालट करण्याचा विश्वास राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार अमोल चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. मतदारसंघातील विविध गावांमध्ये प्रत्यक्ष भेटीगाठी घेत प्रचार करताना त्यांनी हा निर्धार मतदारांसमोर मांडला. अमोल चव्हाण म्हणाले की, उदगाव मतदारसंघाच्या विकासासाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी कोट्यवधी रुपयांची भरीव विकासकामे केली आहेत.रस्ते,पाणीपुरवठा, आरोग्य,शिक्षण व ग्रामविकासाच्या अनेक योजनांमुळे या भागाचा विकास वेगाने झाला आहे. त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखालीच आपण जिल्हा परिषद निवडणूक लढवत आहोत,ही बाब मतदारसंघासाठी अभिमानाची आहे.ते पुढे म्हणाले की,जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यास नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नासाठी आपण कायम उपलब्ध राहू. मतदारसंघातील कोणत्याही नागरिकाचे काम रखडले, विकासकामे थांबली किंवा मूलभूत सुविधा मिळाल्या नाहीत,अशी तक्रार आमदारांकडे किंवा मतदारसंघातून येऊ देणार नाही, इतक्या पारदर्शक व गतिमान पद्धतीने काम करण्याचा माझा संकल्प आहे.प्रचारादरम्यान ग्रामस्थांनी विविध समस्या,अपेक्षा व सूचना मांडल्या. रस्त्यांची दुरुस्ती,पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी सोय,युवकांसाठी रोजगाराच्या संधी,महिलांसाठी स्वयंसहायता गटांना बळकटी देणे आदी मुद्द्यांवर अमोल चव्हाण यांनी सकारात्मक भूमिका मांडली. विकासकामांमध्ये कोणताही भेदभाव न करता सर्व गावांना समान न्याय देण्यात येईल,असेही त्यांनी स्पष्ट केले.राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांना केंद्रस्थानी ठेवून सामाजिक न्याय, विकास व लोकहिताच्या धोरणांवर काम करण्याचा निर्धार अमोल चव्हाण यांनी व्यक्त केला.नागरिकांचा विश्वास, आघाडीचे नेतृत्व आणि आमदारांचे मार्गदर्शन यामुळे उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघात विकासाची नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Comment

error: Content is protected !!