अंगणवाडी सेविका-मदतनीसांचा लाडक्या बहिणी योजनेच्या ई-केवायसी कामावर बहिष्कार

Spread the love

कोल्हापूर / प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य शासनाने लाडक्या बहिणी योजनेतील अपात्र लाभार्थींचे ई-केवायसी करण्याची जबाबदारी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावर टाकली आहे.मात्र हे काम एकात्मिक बाल विकास योजनेच्या कार्यक्षेत्राबाहेरील असून त्यामुळे अंगणवाडीच्या नियमित कामकाजावर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होत असल्याचा आरोप अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी केला आहे.या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी आजपासून लाडक्या बहिणी योजनेच्या ई-केवायसी कामावर बहिष्कार आंदोलन सुरू केले आहे.या आंदोलनाची सुरुवात आज जिल्ह्यातील प्रत्येक गावात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी काळ्या फिती लावून केली.शासनाने दिलेल्या अतिरिक्त जबाबदाऱ्यांमुळे अंगणवाडीतील नियमित कामे खोळंबत असून बालकांची उपस्थिती कमी होत आहे. परिणामी एकात्मिक बाल विकास योजनेची मूळ उद्दिष्टे पूर्ण क्षमतेने राबविता येत नसल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.याचा थेट परिणाम लहान मुलांचे शिक्षण,संस्कार तसेच पोषणावर होत असून कुपोषणामध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.या मागणीसाठी अधिकारी महासंघ व पर्यवेक्षक संघटनांनीही शासनाविरोधात आंदोलन सुरू केले असून अंगणवाडी सेविका-मदतनीसांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दर्शविण्यात आला आहे. शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना योजना बाह्य कामांपासून मुक्त करावे, अशी ठाम मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनचे अध्यक्ष कॉम्रेड आप्पा पाटील व सरचिटणीस कॉम्रेड जयश्री पाटील यांनी सांगितले की, काळ्या फितीचे आंदोलन ही केवळ सुरुवात असून शासनाने तात्काळ निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.टप्प्याटप्प्याने आंदोलन छेडण्यात येणार असून लवकरच जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला. शासनाने अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यावर अन्यायकारक पद्धतीने लादलेली अतिरिक्त कामे त्वरित मागे घ्यावीत,अन्यथा आंदोलन अधिक व्यापक स्वरूप धारण करेल, असा निर्धार संघटनांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!