शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ ही नगरी कायमच खेळाची पंढरी म्हणून ओळखली जाते.कबड्डी, क्रिकेट,मातीतील कुस्ती या खेळांतून अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू या मातीत घडले आहेत. या गौरवशाली परंपरेत आता कराटे या खेळानेही आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले असून,शिरोळचा सुपुत्र कुमार आरमान सर्फराज कुरणे याने कराटेमध्ये ऐतिहासिक कामगिरी करत कोल्हापूर जिल्ह्याच्या क्रीडा इतिहासात सुवर्णअक्षरांनी नाव कोरले आहे. बारामती येथे नुकत्याच पार पडलेल्या ६९ व्या आंतरराष्ट्रीय कराटे क्रीडा स्पर्धेत कुमार आरमान कुरणे याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णपदक (गोल्ड मेडल) पटकावले.विशेष म्हणजे कराटे या खेळात कोल्हापूर जिल्ह्याला मिळालेले हे पहिले सुवर्णपदक ठरले असून,ही कामगिरी संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे.अत्यंत साध्या परिस्थितीतून आलेल्या कुमारने आर्थिक अडचणी, अपुरी साधनसामग्री आणि कठोर सराव यांवर मात करत ही यशोगाथा घडवली. त्याची चिकाटी, शिस्त, जिद्द आणि खेळावरील निष्ठा आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे. “परिश्रमाला पर्याय नाही” हे त्याने आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवले आहे.या ऐतिहासिक यशाबद्दल शिरोळ शहराच्यावतीने भव्य स्वागत व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.शिरोळ नगरपालिकेच्या पहिल्या महिला लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. योगिता कांबळे व उपनगराध्यक्ष पृथ्वीराज सिंह यादव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या तक्ताजवळ कुमार आरमान कुरणे याचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.यानंतर शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. हलगी-तुतारीच्या गजरात माजी आमदार भाई दिनकररावजी यादव यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.या मिरवणुकीत शिरोळकर नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.या प्रसंगी अजिंक्यतारा मंडळाचे अध्यक्ष धनाजी पाटील नरदेकर, शक्तीजीत गुरव, प्रकाश माळी, युवा नेते पद्मश्री पाटील, परवेज मेस्त्री, आयुब मेस्त्री, नजीर शेख, राजू माने, अमर खलीप, रवी गावडे (बासुंदी),अब्जु कुरणे, सलीम कुरणे, तय्यब कागवाडे, वसीम मुल्लाणी,रुकेज मुल्लाणी, पप्पू पाटील यांच्यासह अजिंक्यतारा मंडळ व अष्टविनायक मंडळाचे सदस्य,तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.कुमार आरमान कुरणेच्या या यशामुळे शिरोळच्या क्रीडा परंपरेत नवे पर्व सुरू झाले असून,कराटे खेळाकडेही आता नव्या पिढीचा ओढा वाढणार आहे. शिरोळच्या मातीने पुन्हा एकदा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला आहे.त्यामुळे शिरोळ शहराची ओळख राज्य पातळीवर होत आहे.