शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील राजकीय वातावरण तापलं असून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या राजर्षी शाहू विकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात निवडणुकीत भाजप नेत्यांच्या फोटो वापरण्यावरून शीतयुद्ध सुरू झाले आहे.जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक सुरुवातीला भाजपकडून महायुती म्हणून लढण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता, मात्र जागावाटपावर एकमत न झाल्याने भाजपने स्वतंत्र लढण्याचा स्पष्ट निर्णय घेतला आहे.भाजपने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत एकूण ७ पैकी केवळ ३ जागांची मागणी केली होती.ही मागणी रास्त असूनही आम्ही हट्टाला पेटलो नाही,असा दावा मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केला आहे.मात्र आमदार यड्रावकर यांनी कधी ३ जागा, कधी २ तर कधी फक्त १ जागेचा प्रस्ताव देत भाजपला सातत्याने संभ्रमात ठेवले.अखेर ठोस निर्णय न झाल्याने युती फिस्कटली.त्यामुळं आम्ही भाजप चिन्हावर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र, आमदार यड्रावकर यांना स्वतःला निवडणुकीबाबत खात्री नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपच्या नेत्यांचे फोटो प्रचारासाठी वापरण्यात येत असल्याचे समोर आले आहे.विशेष म्हणजे भाजपच्या कमळ चिन्हावर लढण्यास स्पष्ट नकार देणाऱ्या यड्रावकरांकडून भाजपच्या सर्वोच्च नेत्यांचे फोटो वापरणे म्हणजे दुहेरी भूमिका असल्याचा आरोप केला जात आहे.मंत्री चंद्रकांतदादा पाटील पुढे म्हणाले देशातील २२ राज्यांत भाजपचे सरकार असून पंतप्रधान, राष्ट्रपती आणि मुख्यमंत्री भाजपचे असताना आम्ही भाजपच्या चिन्हावरच लढणार, ही आमची ठाम भूमिका होती.मात्र आमदार यड्रावकर यांनी “कमळ” चिन्हावर लढण्यास नकार दिल्याने भाजपने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले.जर भाजपचे चिन्ह चालत नसेल,तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादा पाटील यांचे फोटोही चालणार नाहीत.आमदार यड्रावकर यांनी मोदी – फडणवीसांच्या फोटोशिवाय मते मिळत नाहीत, हे उघडपणे मान्य करावं,असा थेट सवाल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी उपस्थित केला आहे.या प्रचार फलकावर फोटो वरून मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी कडक भूमिका घेतली असून,ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी आमदार यड्रावकर यांना संध्याकाळपर्यंत सर्व बॅनर व फलकांवरून भाजपच्या नेत्यांचे फोटो तात्काळ काढून टाकण्याच्या सूचना देण्यात याव्यात,असा आदेश देण्यात आला आहे.शिरोळ तालुक्यातील ही लढत आता केवळ निवडणुकीपुरती न राहता राजकीय प्रतिष्ठेची बनली असून,आगामी काळात संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.