अर्जुनवाड / प्रतिनिधी
अर्जुनवाड परिसराच्या विकासात मोलाचे योगदान देणारे माजी सरपंच शिवाजी म्हैशाळे यांच्या कार्याची दखल घेत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी म्हैशाळे कुटुंबातील सौ.सीमा जितेंद्र म्हैशाळे यांना अर्जुनवाड पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. या निर्णयामुळे परिसरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधान आणि आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.शिवाजी म्हैशाळे २०१० साली सरपंच असताना गावाच्या मूलभूत गरजांवर काम केले, त्यांच्या प्रयत्नातून तब्बल २ कोटी ७८ लाख रुपयांची राष्ट्रीय पेयजल योजना मंजूर झाली.या योजनेच्या माध्यमातून बिरोबा माळ,खोत मळा,शिरोळ उगारे मळा,घालवाड रस्ता यासह वाड्यावस्त्यांवरील नागरिकांना शुद्ध व मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले.अनेक वर्षांपासून भेडसावत असलेला पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यात त्यांना यश आले.२०१० सालच्या सरपंच कार्यकाळात त्यांनी विविध विकास कामे मार्गी लावत गावच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महत्त्वाचे आणि धाडसी निर्णय घेतले.विशेष बाब म्हणजे ग्रामपंचायतीकडून मिळालेला सुमारे २२ हजार रुपयांचा सरपंच भत्ता तसेच स्वतःच्या खिशातून पैसे घालून ग्रामपंचायत इमारत रंगवून घेतली. ग्रामपंचायतीचा एकही रुपया वैयक्तिक वापरासाठी न करता ग्रामपंचायतीला उर्जित अवस्था आणण्याचे उदाहरण त्यांनी घालून दिले.राजकारण करत असताना शिवाजी म्हैशाळे यांनी नेहमीच सर्वसामान्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून पारदर्शक आणि निस्वार्थ भूमिका घेतली.ही बाब आजही गावात आदराने सांगितली जाते.महापूर आणि कोरोना या नैसर्गिक आपत्तीत म्हैशाळे कुटुंबाने केलेल्या सामाजिक आणि विकासाभिमुख कार्याची योग्य दखल घेत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सौ.सीमा जितेंद्र म्हैशाळे यांना पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी देऊन म्हैशाळे कुटुंबाच्या सामाजिक कार्याला आणखी बळ दिले आहे.सौ.सीमा म्हैशाळे या आपल्या कुटुंबाचा सामाजिक,शैक्षणिक आणि राजकीय वारसा पुढे नेत अर्जुनवाड पंचायत समिती मतदारसंघातील सर्व घटकांना सोबत घेऊन विकास करतील,असा विश्वास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह चिंचवाड,अर्जुनवाड,घालवाड,कुटवाड, कनवाड व हसुर येथील मतदारांकडून व्यक्त केला जात आहे. विकास,पारदर्शकता आणि लोकहिताला प्राधान्य देणारे नेतृत्व मिळावे,अशी भावना मतदारांमधून व्यक्त होत आहे.