राजू शेट्टींना दुसरा धक्का, स्वाभिमानीचा २५ वर्षे एकनिष्ठ आवळे गटाचा यड्रावकरात गटात प्रवेश 

Spread the love

अब्दुल लाट / प्रतिनिधी 

शिरोळ तालुक्यातील राजकारणात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पुन्हा एकदा आपली रणनीतीची धार दाखवत मोठा राजकीय धक्का दिला आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी तब्बल २५ वर्षे एकनिष्ठ असलेले प्रशांत आवळे व जयश्री आवळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राजर्षी शाहू विकास आघाडीत जाहीर प्रवेश केला.हा प्रवेश आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत यड्रावकर गटात झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसनंतर आता थेट स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाच आमदार यड्रावकरांनी दुसरा मोठा धक्का दिल्याचे स्पष्ट झाले आहे. शिरोळ तालुक्यातील राजकारणात गेली अनेक वर्षे प्रभाव असलेल्या राजू शेट्टी यांच्या संघटनेतील महत्त्वाचे चेहरे आणि कार्यकर्ते गळतीला लागल्याने स्वाभिमानीची ताकद कमकुवत होत असल्याचे चित्र दिसत आहे.या घडामोडींमुळे आमदार यड्रावकर यांनी काँग्रेसचे गणपतराव पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी या दोघांच्या समर्थकांना आपल्या गटात सामील करून घेत राजकीय डाव यशस्वी केल्याचे बोलले जात आहे.विशेष म्हणजे हा प्रवेश अब्दुल लाट जिल्हा परिषद मतदारसंघाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.या घडामोडीनंतर अब्दुल लाट जिल्हा परिषद मतदारसंघात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचे वर्चस्व वाढले असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची चिंता वाढली आहे.काँग्रेसचे गणपतराव पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि भाजपचे विजय भोजे यांच्यासमोर आता आपले राजकीय अस्तित्व टिकवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.शिरोळ तालुक्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असून, आमदार यड्रावकर यांची वाढती ताकद आगामी काळात स्थानिक राजकारणाला नवी दिशा देणार असल्याचे स्पष्ट संकेत या घडामोडीतून मिळत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!