यड्राव / प्रतिनिधी
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यड्राव मतदारसंघातील महिला मतदारांनी एक ठाम व सामाजिक जाणीव जपणारा निर्णय घेतला आहे.निवडणुकीच्या काळात चार – आठ दिवस जेवण,दारू किंवा पैशांचे आमिष दाखवून मतदारांना भूलवणाऱ्या उमेदवारांच्या मागे न जाता,तरुणांच्या हाताला काम देणाऱ्या आणि व्यसनमुक्त समाज घडवण्याचा दृष्टिकोन असलेल्या उमेदवारालाच साथ देण्याचा निर्धार महिला वर्गातून व्यक्त केला जात आहे.सध्या ग्रामीण भागातील तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात भरकटत चालला असून दारू,गुटखा, तंबाखू,पान यांसारख्या व्यसनांच्या आहारी जात आहे.विशेषतः दारूच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबांचे संसार उध्वस्त झाले आहेत.घरगुती भांडणे,आर्थिक अडचणी, कर्जबाजारीपणा आणि मुलांच्या शिक्षणावर होणारा परिणाम या सगळ्याचा सामना महिलांना करावा लागत आहे.निवडणुकीपुरते दिले जाणारे पैसे किंवा दारू काही दिवस देतात,मात्र त्यातून ना रोजगार मिळतो, ना कुटुंबांचे भविष्य सुरक्षित होते.आमच्या मुलांना काम नाही म्हणून ते व्यसनाच्या आहारी जात आहेत.काम मिळाले तर ते सन्मानाने जगू शकतात,अशी भावना अनेक महिलांनी व्यक्त केली.त्यामुळेच यावेळी महिलांनी दारू,जेवण आणि पैशांच्या आमिषाला बळी न पडण्याचा निर्णय घेतला आहे.गावात उद्योगधंदे, प्रशिक्षण केंद्रे,स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणाऱ्या,तसेच तरुणांना योग्य दिशा देणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार करण्यात आला आहे.यड्राव मतदारसंघातील महिलांचा हा बदलता दृष्टिकोन निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.महिलांचा मतदानातील सहभाग वाढत असून त्या आता तात्पुरत्या फायद्यांपेक्षा दीर्घकालीन विकासाला महत्त्व देत आहेत.आमचे संसार टिकवायचे असतील आणि पुढील पिढी सुरक्षित करायची असेल तर योग्य नेतृत्व निवडणे गरजेचे आहे,असे मत महिला मतदारांनी व्यक्त केले.महिलांच्या या ठाम भूमिकेमुळे यड्राव मतदारसंघात येणाऱ्या निवडणुकीत रोजगार आणि व्यसनमुक्ती हेच मुख्य मुद्दे ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.