जांभळी / प्रतिनिधी
जांभळी (ता. शिरोळ) येथील संदीप भाऊसो पाटील (वय ४२) व्यवसायाने जिम ट्रेनर यांची लोखंडी रॉड व पाईपने डोक्यात वर्मी घाव घालून अज्ञात हल्लेखोरानी मारहाण करून हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवार दिनांक २८ जानेवारी रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कुरडे मळा,जांभळी–जयसिंगपूर रिलायन्स पेट्रोल पंप रोड परिसरात घडली.या घटनेमुळे जांभळीसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, जांभळी येथील जिम ट्रेनर संदीप पाटील यांनी अज्ञात हल्लेखोरांनी लोखंडी रॉडने डोक्यावर व शरीरावर जोरदार मारहाणीत गंभीर जखमी पाटील यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले. दरम्यान हत्या केल्यानंतर आरोपींनी एमएच 14 FC 0945 क्रमांकाची फोर व्हीलर इर्टिगा गाडी घटनास्थळीच सोडली असून,गाडीमध्ये लोखंडी रॉड व कोयता आढळून आला आहे.यानंतर आरोपी घटनास्थळावरून पलायन झाले. घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्यासह शिरोळ पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.घटनास्थळाजवळ एक चारचाकी व एक दुचाकी वाहन,लोखंडी रॉड आढळून आले असून,या वाहनांचा तपास पोलीस करत आहेत.हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून,वैयक्तिक वाद,आर्थिक व्यवहार किंवा अन्य कारणामुळे ही हत्या झाली असावी,असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान,हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून,लवकरच आरोपींचा छडा लागेल,असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.जयसिंगपूर व शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीवरून काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.संदीप पाटील यांच्या हत्येमुळे जांभळी परिसरात खळबळ उडाली आहे.