उदगाव / प्रतिनिधी
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात राजकीय वातावरण तापले असतानाच उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघात एक नवा वाद उफाळून आला आहे.राजर्षी शाहू आघाडीच्या प्रचार पोस्टरवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे फोटो झळकल्याने राजकीय चर्चांना उधाण आले असून,याच मतदारसंघात भाजपने स्वतंत्र उमेदवार दिल्यामुळे मतदारांपासून ते पक्ष कार्यकर्त्यांपर्यंत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.राजर्षी शाहू आघाडीच्या प्रचार साहित्यावर भाजप नेत्यांचे फोटो वापरले जात असल्याने,भाजपचा या आघाडीला अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचा संदेश सर्वसामान्य जनतेमध्ये जात आहे.मात्र प्रत्यक्षात भाजपकडून स्वतंत्र उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्यात आल्याने ‘नेमकी भाजपची भूमिका काय?’ असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.या विरोधाभासी भूमिकेमुळे मतदारसंघात संभ्रम निर्माण झाला असून निवडणूक प्रचारादरम्यान हा मुद्दा चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.राजकीय विश्लेषकांच्या मते, भाजपकडून ही दुहेरी राजकीय खेळी खेळली जात असल्याची चर्चा आहे.आघाडी यशस्वी ठरल्यास अप्रत्यक्ष पाठिंब्याचा दावा करता येईल,तर पराभव झाल्यास स्वतंत्र उमेदवार दिल्याचे कारण पुढे करून जबाबदारी टाळण्याचा मार्ग स्वीकारला असल्याची टीका विरोधकांकडून होत आहे.या प्रकारामुळे भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्येही नाराजी व अस्वस्थता दिसून येत आहे.पोस्टरवर आमच्या नेत्यांचे फोटो आहेत आणि प्रत्यक्षात वेगळा उमेदवार दिला आहे.मग आम्ही प्रचार नेमका कुणाचा करायचा? असा सवाल भाजप कार्यकर्ते उघडपणे विचारू लागले आहेत. त्यामुळे संघटनात्मक पातळीवरही संभ्रमाचे वातावरण आहे.दरम्यान,सर्वसामान्य मतदारांमध्येही या मुद्द्यावर जोरदार चर्चा सुरू असून,जर भाजप राजर्षी शाहू आघाडीच्या बाजूने आहे,तर स्वतंत्र उमेदवार देण्याची गरज काय?असा प्रश्न गावागावात उपस्थित केला जात आहे.या संपूर्ण प्रकरणावर भाजप नेतृत्वाकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.त्यामुळे निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात हा मुद्दा अधिकच तापण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.