शिरोळात तिप्पट घरफळा शास्तीवरून नागरिकांमध्ये संभ्रम; बुधवारी होणाऱ्या पहिल्या सभेकडे लक्ष

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ नगरपरिषदेची पहिली सर्वसाधारण सभा बुधवार दिनांक २८ जानेवारी रोजी होत असून या सभेत तिप्पट घरफळा शास्तीचा मुद्दा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.शिरोळ शहरातील अनेक नागरिकांना अलीकडेच तिप्पट घरफळा शास्ती वसुलीच्या नोटिसा बजावण्यात आल्या असून त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.गेल्या वर्षी शासन निर्णयानुसार ही तिप्पट शास्ती रक्कम माफ करण्यात आली होती.असे असतानाही यावर्षी पुन्हा तीच शास्ती वसूल केली जात असल्याने नागरिक संभ्रमात असून त्रस्त झाले आहेत. शासनाने रद्द केलेली शास्ती पुन्हा का आकारली जात आहे,असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. नुकतेच नियुक्त झालेले नगरपरिषदेचे सदस्य या शास्तीचा प्रश्न गंभीरतेने घ्यावा,अशी मागणी नागरिकांतून होत आहे.बुधवारच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत तिप्पट घरफळा शास्ती रद्द करण्याचा ठराव मंजूर करावा,कारण तो अधिकार नगरपरिषद सदस्यांनाच आहे,असे नागरिकांचे म्हणणे आहे.हा ठराव मंजूर करून तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवावा,अशीही मागणी करण्यात येत आहे.दरम्यान,शास्ती रद्दचा अंतिम निर्णय होईपर्यंत कोणाकडूनही शास्तीची रक्कम वसूल करू नये,याबाबत वसुली कर्मचारी व अधिकाऱ्यांना सक्त सूचना द्याव्यात, अशी मागणीही नागरिकांकडून जोर धरत आहे.या पार्श्वभूमीवर बुधवारच्या सर्वसाधारण सभेत नगरपरिषद कोणता निर्णय घेते,याकडे शिरोळ शहरातील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!