अर्जुनवाड येथे शाहू आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ
अर्जुनवाड / प्रतिनिधी
मतांच्या आकड्यांपेक्षा गावांच्या मूलभूत गरजा ओळखून विकासकामांना प्राधान्य दिल्यामुळे गेल्या पाच ते सात वर्षांत शिरोळ तालुक्याचा चेहरामोहरा बदलण्याचे काम सुरू आहे, असे प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.राजर्षी शाहू विकास आघाडीच्या अर्जुनवाड पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार सीमा म्हैशाळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ अर्जुनवाड येथील अर्जुनेश्वर मंदिरात आयोजित सभेत ते बोलत होते.आमदार यड्रावकर म्हणाले, अर्जुनवाड गावात आतापर्यंत सुमारे ८ कोटी ७३ लाख रुपयांची विकासकामे झाली असून संपूर्ण शिरोळ तालुक्यात रस्ते,गटारी,पाणीपुरवठा, समाजमंदिरे व आरोग्य सुविधांसाठी जवळपास २ हजार कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. तालुक्यातील ३७ गावांत फिल्टरयुक्त पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली आहे. आरोग्य व्यवस्थेचा विस्तार करत १००० बेडपर्यंत सुविधा वाढविण्यात आल्या आहेत.तालुक्यात ५० बेडचे ग्रामीण रुग्णालय, ४२० बेडचे मनोरुग्णालय, ३० बेडचे कॅन्सर हॉस्पिटल तसेच १०० बेडचे ‘आयुष’ रुग्णालय प्रस्तावित असून यामुळे नागरिकांना उपचारासाठी तालुक्याबाहेर जाण्याची गरज भासणार नाही, असे त्यांनी सांगितले.रोजगारनिर्मितीसाठी नवीन एमआयडीसी मंजूर करण्यात आली असून स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. शेतीतील क्षारपट्टी समस्येसाठी राज्य शासनाने ८० टक्के अनुदानाची योजना मंजूर केली आहे.पुढील काळात उद्योग,व्यापार व पर्यटन विकासावर विशेष भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.कन्या गट प्रकल्पांच्या माध्यमातून धार्मिक व पर्यटनस्थळांचा विकास करून तालुक्याची आर्थिक स्थिती मजबूत करण्याचा संकल्प व्यक्त करत आमदार यड्रावकर यांनी या विकासाची गती कायम ठेवण्यासाठी पंचायत समितीचे उमेदवार सीमा म्हैशाळे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.यावेळी माजी आमदार उल्हास पाटील म्हणाले, उदगाव जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य पदापासून ते सभापती पदापर्यंत जाण्याचा शाहू आघाडीचा इतिहास आहे.त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवारही निवडून येऊन सभापती पदापर्यंत पोहोचतील,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.अर्जुनवाड व उदगाव मतदारसंघात माणुसकी जपण्याचे काम आमच्या पदाधिकाऱ्यांनी केले असून शाहू आघाडीचा विजय निश्चित आहे,असेही त्यांनी सांगितले.या सभेत हिम्मत पाटील,नंदकुमार पाटील,सतिश मलमे,संतोष जाधव, मुसा इनामदार,कुरुंदवाड नगराध्यक्षा मनिषा डांगे,पंचायत समिती उमेदवार सीमा म्हैशाळे, जिल्हा परिषद उमेदवार अमोल चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास माजी अमरसिंह पाटील, नगरसेविका श्वेता जाधव, कविता चौगुले, प्रदीप पाटील, सरपंच अर्चना थोरात, अशोक चौगुले, परसू देशिंगे, नंदाताई खोत, घालवाडचे सरपंच सुहास खाडे, कनवाडचे सरपंच इरफान बुराण, संपत कोळी, शोभाताई कोळी, बबन पाटील, अमोल पाटील, भाऊसो खडके, सुभाष चव्हाण, अण्णा नारींगकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत माजी सरपंच विकास पाटील यांनी केले तर आभार चंद्रकांत मोरे यांनी मानले.