“बिडवे” यांच्या माघारीमुळे कुणाला ‘संतोष’ तर कुणाला ‘असंतोष’

Spread the love

उदगाव / प्रतिनिधी 

उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेले पत्रकार संतोष बिडवे यांची उमेदवारी अखेर अंतिम क्षणी मागे घेण्यात आली.या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत असून, समर्थकांमध्ये नाराजी तर काही गटांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.भाजपाचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख असलेले संतोष बिडवे यांची उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय सोपा नव्हता.अनेक राजकीय घडामोडी, समीकरणे आणि पक्षांतर्गत चर्चा यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.विशेष म्हणजे, ही उमेदवारी मागे घेण्यासाठी स्वतः खासदार महाडिक यांनाच कठोर भूमिका घ्यावी लागल्याचे बोलले जात आहे.या संदर्भात प्रतिक्रिया देताना धनंजय महाडिक म्हणाले की,“संतोष बिडवे हे समाजात चांगले काम करणारे,स्वच्छ चारित्र्याचे, निःपक्ष व निर्भिड व्यक्तिमत्त्व आहेत. ते माझे सच्चे कार्यकर्ते आहेत. मात्र,काही अपरिहार्य राजकीय घडामोडींमुळे आज त्यांना एक पाऊल मागे घ्यावे लागत आहे,याची मला खंत आहे.” तसेच, झालेल्या घटनांकडे दुर्लक्ष करून भाजपाच्या सर्व उमेदवारांना ताकदीने निवडून आणण्यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.दरम्यान, संतोष बिडवे यांच्या माघारीमुळे मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून,आगामी काळात याचा निवडणुकीवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.काहींना या निर्णयामुळे समाधान मिळाले असले तरी, बिडवे समर्थकांमध्ये असंतोषाची भावना स्पष्टपणे दिसून येत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!