मौजे आगर / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्यातील सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या मौजे आगर गावात सध्या गंभीर पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला असून ऐन हिवाळ्यात नागरिकांना एक ते दोन दिवसाआड व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.नदी पात्रात मुबलक पाणी उपलब्ध असतानाही योग्य नियोजनाअभावी नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.मौजे आगर ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपल्यानंतर सध्या प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.मात्र लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याचा आणि प्रशासक काम करत नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.प्रशासक व लोकप्रतिनिधी यांच्यातील दुर्लक्षामुळेच गावात अपुरा व अनियमित पाणीपुरवठा केला जात असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.गावाला मुबलक व स्वच्छ पाणी मिळावे यासाठी लाखो रुपये खर्च करून नवीन पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे.मात्र टाकी उभारूनही अद्याप अनेक भागांमध्ये एक दिवसाआड व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने ग्रामस्थांच्या प्रश्नांचे निराकरण झालेले नाही.महिलांना पाण्यासाठी ताटकळत बसावे लागत असून ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रामस्थांनी तत्कालीन सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांकडे तक्रार केली असता,“सध्या प्रशासक आहे,आमचा याच्याशी काही संबंध नाही,”अशी उत्तरे दिली जात असल्याने नागरिकांमध्ये अधिकच नाराजी पसरली आहे. कार्यकाळ संपला म्हणजे जनतेला वाऱ्यावर सोडणार का? असा संतापजनक सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.या गंभीर पाणीप्रश्नाकडे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तातडीने लक्ष घालून मौजे आगर ग्रामपंचायत प्रशासनाला मुबलक व नियमित पाणीपुरवठा करण्याच्या स्पष्ट सूचना द्याव्यात,अशी जोरदार मागणी ग्रामस्थांतून करण्यात येत आहे.दरम्यान, मौजे आगर गावातील पिण्याच्या पाण्याची समस्या उदगाव जिल्हा परिषद मतदारसंघात चर्चेचा विषय ठरली आहे. येणाऱ्या काळात मौजे आगरसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याची गरज असल्याचे मत चिंचवाड,अर्जुनवाड,घालवाड, कनवाड, कुटवाड व हसुर या गावांमधून व्यक्त केले जात आहे.