अब्दुललाट / प्रतिनिधी
अब्दुललाट जिल्हा परिषद मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना,काँग्रेस व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वतीने जयश्री दिनकर आवळे यांना अधिकृत एबी फॉर्म देण्यात आला असून ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले आहे.मात्र,ऐन निवडणुकीच्या तोंडावर घडत असलेल्या घडामोडींमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अधिकृत उमेदवारी जाहीर असतानाही भाजपचे ग्रामपंचायत सदस्य तसेच विजय भोजेंचे समर्थक असलेल्या स्वाती लाटकर यांना संघटनेत प्रवेश देऊन त्यांना उमेदवार करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप कॉ.आप्पा पाटील यांनी केला आहे. हा प्रकार म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्त्यांवर होणारा प्रचंड अन्याय असल्याचे ते म्हणाले.कॉ.पाटील यांनी यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यावरही अप्रत्यक्षपणे टीका करत आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला.“आपण नेमक्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देतो आहोत की ऐनवेळी येणाऱ्या उपऱ्यांना?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.ते पुढे म्हणाले की,अब्दुललाट मतदारसंघात भाजप आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यात छुपी अंतर्गत युती करून भाजपचा उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न होत आहे.हा प्रयत्न कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.गेली २५ वर्षे दिनकर आवळे, जयश्री आवळे, प्रशांत आवळे यांच्यासह संपूर्ण आवळे कुटुंबीय स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी प्रामाणिक राहिले आहेत. २०१२ मध्ये पंचायत समितीची निवडणूक संघटनेकडून लढवून पराभव स्वीकारला, ग्रामपंचायत निवडणुकीतही अपयश आले. मात्र, प्रत्येक वेळी संघटनेशी निष्ठा राखणाऱ्या कार्यकर्त्यांना कधी न्याय मिळणार, असा प्रश्न आता मतदारसंघात उपस्थित होत आहे.सर्वसामान्य कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता जर छुपी युती होत असेल, तर येत्या काळात त्याचे उत्तर संबंधित नेत्यांना द्यावे लागेल, असा इशाराही कॉ.पाटील यांनी दिला आहे.