शिरोळ / प्रतिनिधी
शेतकऱ्यांची काटामारी थांबवून पारदर्शकतेचा नवा आदर्श निर्माण करणाऱ्या आंदोलन अंकुश संघटनेने आता उसाच्या रिकव्हरीमध्ये होणाऱ्या चोरीविरोधात निर्णायक पाऊल उचलले आहे. उसाची खरी रिकव्हरी मोजण्यासाठी स्वतंत्र रिकव्हरी तपासणी प्रयोगशाळा उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयोग संघटनेने हाती घेतला असून,या उपक्रमासाठी आजपासून निधी संकलनास सुरुवात करण्यात आली आहे.या उपक्रमाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, पहिल्याच दिवशी ६० हजार रुपयांपेक्षा जास्त निधी जमा झाला आहे. तालुक्यातील प्रत्येक गावातून दानशूर व्यक्ती व शेतकरी यांच्या सहकार्यातून येत्या गळीत हंगामापर्यंत ही प्रयोगशाळा सुरू करण्याचा ठाम संकल्प आंदोलन अंकुश संघटनेने केला आहे.यापूर्वी काटामारी करणाऱ्या साखर कारखान्यांना धडा शिकवत संघटनेने शेतकरी मालकीचा वजन काटा उभारला होता.त्यामुळे काटामारीवर नियंत्रण मिळाले.आता रिकव्हरीमध्ये होणारी लूट चव्हाट्यावर आणण्याचा निर्धार असल्याचे संघटनेचे नेते धनाजी चुडमुंगे यांनी सांगितले.शेतकऱ्यांच्या उसातून निघणारी रिकव्हरी ही पूर्णपणे शेतकऱ्यांचीच आहे.मात्र सध्याच्या व्यवस्थेत प्रयोगशाळांमधील अपारदर्शक प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते.ही अन्यायकारक लूट थांबवण्यासाठी स्वतंत्र, विश्वासार्ह आणि पारदर्शक रिकव्हरी तपासणी प्रयोगशाळा उभारणे आवश्यक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.शेतकरी वजन काट्यावर आयोजित कार्यक्रमात अनेक शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे देणगी देत या उपक्रमाला पाठिंबा दिला.हा प्रयोग यशस्वी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केला.या वेळी जिल्हाध्यक्ष दीपक पाटील,तालुकाध्यक्ष नागेश काळे, उपाध्यक्ष संभाजी शिंदे पाटील,गुरुजी संजय चौगुले,उद्धव मगदूम,जितेंद्र चौगुले,दत्तात्रय जगदाळे,पिंटू ढेकळे,नामदेव माळी,रशीद मुल्ला, धनाजी माने,भूषण गंगावणे,भारत ढाले,दीपक काळे, विक्रम बाबर, चिदानंद आलोळी, पोपट संकपाळ, देवेंद्र चौगुले, कृष्णा देशमुख, योगेश जाधव, अमर सावंत, सोमनाथ तेली, मुसा जमादार, पप्पू काळे, राजाराम जाधव, महेश जाधव, बंटी माळी, राहुल काकडे, महेश आवळेकर, अभिजित आवळेकर, प्रदीप पाटील, पोपट परीट, शिवाजी काळे, अनिल हुपरीकर, प्रशांत थोरवत, अजय ढवळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.