सांगली / प्रतिनिधी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांना हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. सांगली जिल्ह्यात स्वाभिमानी संघटनेचा चेहरा म्हणून ओळख असलेले महेश खराडे यांचा भाजप प्रवेश हा आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जात आहे.मागील बारा वर्षांहून अधिक काळ महेश खराडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सक्रिय होते.या काळात त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर आक्रमक भूमिका घेतली.ऊस दरवाढीसाठीची आंदोलने, दूध दरासाठीचे संघर्ष, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न तसेच पाणी प्रश्नावर उभारलेली आंदोलने यामध्ये त्यांनी नेतृत्व केले.सांगली जिल्ह्यातील अनेक आंदोलनांमुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना राज्यपातळीवर वाचा फुटली होती.मात्र, इतक्या वर्षांच्या आंदोलनानंतरही निवडणुकीच्या काळात संघटना किंवा संघटनेच्या उमेदवारांच्या पाठीशी अपेक्षित पाठबळ उभे राहत नसल्याची खंत महेश खराडे यांनी व्यक्त केली आहे. आंदोलनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला,तरीही राजकीय पाठबळ मिळत नाही, ही सल मनाला लागून राहिली,असे ते म्हणाले.याच पार्श्वभूमीवर भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजपच्या माध्यमातून सत्तेत राहून शेतकऱ्यांसाठी रचनात्मक आणि विकासाभिमुख काम करता येईल,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.केवळ आंदोलनांपुरते मर्यादित न राहता, शासनाच्या धोरणांतून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.महेश खराडे यांच्या भाजप प्रवेशामुळे सांगली जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संघटनात्मक ताकदीला मोठा धक्का बसला असून,आगामी काळात याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.