शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ तालुक्याचा सर्वांगीण आणि राजकारणविरहित विकास हेच राजर्षी शाहू विकास आघाडीचे प्रमुख उद्दिष्ट असून, सर्वसामान्यांच्या हाताला काम मिळावे व त्यांचे आर्थिक स्थैर्य वाढावे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, शिरोळ तालुक्यात आतापर्यंत सुमारे २ हजार कोटी रुपयांची विकासकामे करण्यात आली असून, विरोधकांकडे टीकेशिवाय कोणताही ठोस विकासात्मक मुद्दा उरलेला नाही.ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदार व खासदार हे सर्व एकाच विचाराचे असतील तरच तालुक्याच्या विकासाला खरी गती मिळते. स्व. दत्ताजीराव कदम यांच्या वारशाचा उल्लेख करत, केवळ पुतळ्याला हार घालणे म्हणजे आदरांजली नव्हे, तर त्यांच्या वारसांना राजकीय प्रवाहात सामावून घेणे ही खरी आदरांजली आहे. त्यामुळे सर्वांना सामावून घेऊन आम्ही राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्वच जागा मोठ्या मताधिक्याने निवडून आणू,असा विश्वास आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी व्यक्त केला.शिरोळ तालुक्यातील ७ जिल्हा परिषद व १४ पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजर्षी शाहू विकास आघाडी व मित्र पक्षांचा संयुक्त कार्यकर्ता मेळाव्यात आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर बोलत होते.आमदार यड्रावकर पुढे म्हणाले, कुरुंदवाड आणि जयसिंगपूर नगरपालिकेत राजर्षी शाहू विकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यानंतर दोन्ही नगरपालिकांसाठी २३ कोटी ५० लाख रुपयांचा विकास निधी मंजूर झाला असून, विकासाभिमुख आणि समान विचारांची माणसे सत्तेवर असतील तरच शिरोळ तालुक्याचा सर्वांगीण विकास वेगाने होऊ शकतो. शिरोळ तालुक्यात आतापर्यंत सुमारे २ हजार कोटी रुपयांची विविध विकासकामे करण्यात आली असून, यामध्ये पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, सहकार व औद्योगिक क्षेत्रातील कामांचा समावेश आहे. मात्र या विकासकामांवर चर्चा करण्याऐवजी विरोधकांकडे केवळ टीका करण्याव्यतिरिक्त कोणताही ठोस मुद्दा उरलेला नाही,असा आरोप करण्यात आला.राजकारणापेक्षा विकासाला प्राधान्य देत शिरोळ तालुक्याची सेवा करण्याचा निर्धार राजर्षी शाहू विकास आघाडीने केला आहे. तालुक्यातील सर्वसामान्यांचे आर्थिक स्थैर्य वाढवणे, रोजगारनिर्मिती करणे आणि युवकांना कामाच्या संधी उपलब्ध करून देणे हे आघाडीचे प्रमुख उद्दिष्ट स्पष्ट केले. यासाठी तालुक्यातील सर्व समविचारी पक्ष व कार्यकर्ते एकत्र येऊन काम करणार असल्याचे सांगण्यात आले.केवळ आमदार किंवा खासदार निवडून दिल्याने विकास होत नाही, तर ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदार आणि खासदार हे सर्व एकाच विचाराचे आणि विकासाभिमुख असतील तरच तालुक्याच्या विकासाला खरी गती मिळते, असे मत व्यक्त करण्यात आले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत योग्य आणि सर्वसामान्य विकासात्मक चेहऱ्यांना संधी देण्याचे आवाहन करण्यात आले.देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार आणि स्व. दत्ताजीराव कदम यांच्या विकासात्मक कार्याचा उल्लेख करत, त्या काळात एक साखर कारखाना उभा राहिला की दुसरा कारखाना उभा राहत असे, सूतगिरण्या आणि विविध संस्था उभ्या राहत असे, मात्र आजच्या राजकारणात शिरोळ तालुक्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या नेत्यांना विसरले जात असल्याची खंत व्यक्त करण्यात आली. राज्यात महायुतीचे सरकार आहे, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर राजर्षी शाहू विकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून आले तर शिरोळ तालुक्यासाठी मोठ्या प्रमाणात विकास निधी आणता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सर्वसामान्य आणि विकासाभिमुख उमेदवारांना संधी देण्यात आल्याचे सांगत, शिरोळ तालुक्याचा वेगळा विकासात्मक ठसा उमटवण्यासाठी आघाडीच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे आव्हान त्यांनी केले.खासदार धैर्यशील माने म्हणाले,विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले,मालक या शब्दाचा अर्थ म्हणजे माझ्यासाठी लढणारा कर्मयोगी हा आहे. विरोधी पक्ष आणि आपला पक्ष याची सांगड कशी घालावी हे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्याकडून शिकावे लागेल. सर्वधर्म समभाव आम्ही ऐकले आहे मात्र सर्व पक्ष समभाव हे मात्र राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दाखवून दिले आहे. सर्वांना एकत्र घेऊन शिरोळ तालुक्याचा विकास कसा साधता येईल हे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दाखवून दिले आहे.विरोधकांनी टीका करण्यापेक्षा विचार करावा की आपली माणसे आपल्याला सोडून का जात आहेत. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या नेतृत्वावर आणि कर्तुत्वावर विश्वास ठेवून अनेक लोक या विचारात सामील होत आहेत, याचे एकमेव कारण म्हणजे आपलं नाणं खणखणीत आहे आणि ते कामासाठी समर्पित आहे. शिरोळ तालुक्यातील बहुजन समाजाच्या शिल्यादारांना राजर्षी शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी निवडणूक लढवण्याचे संधी दिली आहे. निश्चितच राजर्षी शाहू विकास आघाडीचे सर्वच उमेदवार निवडून येतील, हे सांगायला आता कोणा ज्योतिषाची गरज लागणार नाही.जर विरोधकांच्यात स्वाभिमान शिल्लक राहिला असेल तर स्वर्गीय दत्ताजीराव कदम अण्णा यांच्या सुनेंला बिनविरोध आणा असे आवाहन त्यांनी केले.प्रारंभी स्वागत सतिश मलमे यांनी केले. या प्रसंगी महादेवराव धनवडे, जीवन दरगे, रावसाहेब भिलवडे, कुरुंदवाडच्या नगराध्यक्षा मनिषा डांगे, विनोद पाटील, धनाजीराव जगदाळे, बापूसाहेब दळवी यांची मनोगते झाली.या प्रसंगी प्रकाश पाटील टाकवडेकर, रामचंद्र डांगे, अमरसिंह पाटील, बाबा पाटील, भवनिसिंह घोरपडे, जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, सागर शंभुशेटे, बी.जी. माने, विक्रमसिंह जगदाळे, सतेंद्रराजे नाईक निंबाळकर, रणजित कदम, चंद्रकांत मोरे, दादासो सांगावे, रमेश भुजूगडे, बंडू कुलकर्णी, विकास पाटील, रणजित कदम, सुभाषसिंग रजपूत यांच्यासह १४ पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवार, ७ जिल्हा परिषद मतदार संघातील उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बबन यादव यांनी तर आभार बापूसो दळवी यांनी मानले.