उदगाव जि.प मतदार संघात सावकर मादनाईक यांची प्रतिष्ठा पणाला, आमदार यड्रावकर व स्वाभिमानीचे मोठे आव्हान

Spread the love

उदगाव / प्रतिनिधी 

उदगाव जिल्हा परिषद मतदार संघात राजकीय वातावरण तापलं आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून भाजपमध्ये दाखल झालेले सावकर मादनाईक यांना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व स्वाभिमानीने कोंडीत पकडले आहे. मादनाईक यांनी विधानसभा आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीत राजर्षी शाहू आघाडीचे प्रमुख आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना साथ दिली होती.मात्र जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत आमदार यड्रावकर यांनी भाजपला युतीचे आश्वासन देत शेवटच्या क्षणापर्यंत झुलवत ठेवले आणि ऐनवेळी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेत महायुती तोडली.त्यामुळं सावकर मादनाईक यांना आपल्या राजकीय अस्तित्वासाठी उदगाव मतदार संघातून जिल्हा परिषद भाजपकडून संदीप पुजारी यांना उमेदवारी देऊन निवडणूकीचे रणशिंग फुंकले, ज्यांना पूर्वी साथ दिली, त्या आमदार यड्रावकर यांनी ऐनवेळी साथ सोडल्यामुळे, आता सावकर मादनाईकांसमोर ही खरी परीक्षा आहे.उदगाव मतदार संघ हा स्वाभिमानीचा बालेकिल्ला मानला जातो,परंतु सावकर मादनाईक यांचे या भागात मोठे वर्चस्व असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.गत निवडणुकीत माजी आमदार उल्हास पाटील यांनी सावकर मादनाईक यांना धक्का दिला होता,त्यामुळे या वेळी सावकर मादनाईकांसमोर प्रतिशोधाची संधी आहे.दरम्यान,उदगाव मतदार संघातून आमदार यड्रावकर यांना विधानसभेत मोठे मताधिक्य सावकर मादनाईक यांनीच दिले होते. आता तेच त्यांचे राजकीय सामर्थ्य आणि प्रतिष्ठा स्वाभिमानी,आमदार यड्रावकर आणि भाजपला दाखवण्याच्या तयारीत आहेत.या सर्व राजकीय घडामोडीचा परिणाम जिल्हा परिषद निवडणुकीत राजकीय समीकरण बदलणार आहेत.त्यामुळे उदगाव मतदार संघात सावकर मादनाईक यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे, आणि हे पाहणे रंजक ठरणार आहे की, भाजप, स्वाभिमानी व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना या निवडणुकीत किती ताकद मिळते.

Leave a Comment

error: Content is protected !!