शिरोळ / प्रतिनिधी
भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.या राष्ट्रीय पर्वाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारी म्हणून शिरोळ पंचायत समितीच्या आवारात व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. शिरोळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय परीट यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीतील सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांनी स्वतः पुढाकार घेऊन परिसराची स्वच्छता केली.या स्वच्छता मोहिमेत पंचायत समितीच्या मुख्य इमारतीसह सभोवतालचा परिसर,कार्यालयीन खोल्या,बैठक कक्ष, प्रवेशद्वार,पायऱ्या,स्वच्छतागृहे तसेच मोकळ्या जागांची साफसफाई करण्यात आली.साचलेला कचरा, प्लास्टिक साहित्य, झाडांची कोरडी पाने हटवून परिसर स्वच्छ व नीटनेटका करण्यात आला. स्वच्छतेसोबतच कार्यालयीन परिसर अधिक आकर्षक व शिस्तबद्ध दिसावा यासाठी विशेष लक्ष देण्यात आले.गटविकास अधिकारी विजय परीट यांनी यावेळी अधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, प्रजासत्ताक दिन हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा दिवस आहे.या दिवशी शासकीय कार्यालये स्वच्छ, सुव्यवस्थित आणि आदर्श स्वरूपात दिसली पाहिजेत.स्वच्छता ही केवळ एक दिवसापुरती मर्यादित न राहता ती आपल्या दैनंदिन कामकाजाचा भाग झाली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.या उपक्रमात पंचायत समितीतील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी,शिपाई वर्ग तसेच स्वच्छता कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.सर्वांनी उत्साहाने काम करत सामूहिक जबाबदारीची जाणीव ठेवून स्वच्छता मोहीम यशस्वी केली.या स्वच्छता मोहिमेमुळे पंचायत समिती परिसर स्वच्छ,सुंदर व प्रसन्न झाला असून शिरोळ पंचायत समितीच्या या उपक्रमाचे नागरिकांकडूनही कौतुक करण्यात येत आहे.