शिरोळ / प्रतिनिधी
येथील शब्दगंध साहित्य परिषदेच्या वतीने रविवार, दि. १ फेब्रुवारी २०२६ रोजी दीनबंधू भाई दिनकररावजी यादव स्मृती साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी ख्यातनाम कवी विठ्ठल वाघ विराजमान होणार आहेत.प्रसिद्ध धन्वंतरी डॉ.अनिल मडके यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.श्री दत्त साखर कारखाना उद्योग समूहाचे प्रमुख तथा उद्यानपंडित गणपतराव पाटील हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत.एकदिवशीय या संमेलनात ग्रंथदिंडी,पुरस्कार वितरण,पुस्तक प्रकाशन,कथाकथन, निमंत्रितांचे कवी संमेलन आणि काव्यकट्टा असे विविध साहित्यिक उपक्रम आयोजित करण्यात आले असून साहित्य रसिकांसाठी ही एक पर्वणी ठरणार असल्याची माहिती शब्दगंध साहित्य परिषदेचे अध्यक्ष सुनील इनामदार, उपाध्यक्ष डॉ. दगडू माने व सचिव शंतनू यादव यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.रविवार, दि. १ फेब्रुवारी रोजी सकाळच्या पहिल्या सत्रात यादव निवास ते श्री दत्त साखर कारखान्याच्या कार्यस्थळावरील कै.दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळ क्रीडांगणावरील संमेलन स्थळापर्यंत ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. त्यानंतर संमेलनाचे उद्घाटन,सहा पुस्तकांचे प्रकाशन तसेच ज्येष्ठ लेखिका व कवयित्री नीलम माणगावे यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.याचवेळी राष्ट्रीय कबड्डी खेळाडू सौरभ इंगळे यांना कै.भाई दिनकररावजी यादव जिल्हास्तरीय क्रीडा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. दुपारच्या सत्रात प्रसिद्ध गायक व सिनेअभिनेते रावसाहेब भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथील प्रसिद्ध कथाकार प्रतिमा इंगोले यांचे कथाकथन होणार आहे. तिसऱ्या सत्रात दुपारी ४ वाजता दंगलकार नितीन चंदनशिवे यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कवी संमेलन आयोजित करण्यात आले आहे.सायंकाळी साडेपाच वाजता साहित्यिक व ज्येष्ठ पत्रकार संजय सुतार यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय कवींना काव्यकट्टा या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.काव्यकट्ट्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या नवोदित कवींनी संजय सुतार (मो. 8600857207) किंवा डॉ. दगडू माने (मो. 9822544321) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.साहित्यप्रेमींनी या संमेलनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.