शिरटी / प्रतिनिधी
शिरटी (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत गंभीर तक्रारी समोर येत असून ग्रामपंचायत सदस्य अभयकुमार गुरव यांनी ग्रामसेवक व सत्ताधारी बॉडीच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. ग्रामपंचायतीतील भोंगळ आणि निष्काळजी कारभारामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरत असल्याचे त्यांनी सांगितले.घरकुल योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात अनियमितता सुरू असून संबंधित रोजगार सेवक सध्या कार्यरत नाही. सदर रोजगार सेवकाने राजीनामा दिला असतानाही त्यांचा संपूर्ण कार्यकाळाचा पगार अद्याप अदा करण्यात आलेला नाही. परिणामी पंचायत समितीकडून होणाऱ्या घरकुल बांधकामासंदर्भातील ठराव व मागणी प्रस्ताव पाठविण्यात अडथळे निर्माण होत असून लाभार्थ्यांना हप्ते वेळेवर मिळत नाहीत, असा आरोप गुरव यांनी केला. ग्रामपंचायतीत नागरिक गेले असता त्यांना वेगवेगळी, टाळाटाळ करणारी उत्तरे दिली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. ग्रामपंचायतीच्या मासिक मिटिंगचे ठराव तसेच झालेल्या दोन ग्रामसभा व गावसभेचे ठराव मिळावेत यासाठी लेखी अर्ज करूनही गेली दोन महिने कोणतीही कागदपत्रे देण्यात आलेली नाहीत. याबाबत वरिष्ठ टीपीओ यांच्याकडे तक्रार करूनही कोणतीही कार्यवाही अथवा प्रोसीडिंगची कागदपत्रे मिळालेली नाहीत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.अधिकारी व कर्मचारी वेळेवर कार्यालयात उपस्थित राहत नसल्याने कामकाज ठप्प आहे. स्वतः तक्रार देण्यासाठी सकाळी अकरा वाजता ग्रामपंचायतीत गेलो असता कार्यालयाला कुलूप होते, असेही त्यांनी सांगितले. या प्रकारामुळे नागरिकांच्या हिताच्या व कल्याणकारी योजनांकडे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे.या सर्व प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढत असून भविष्यात आंदोलन करण्याची मानसिकता तयार होत असल्याचे गुरव यांनी स्पष्ट केले. व्यापक बैठक घेऊन तातडीने योग्य पावले उचलली नाहीत, तर याला तीव्र स्वरूपाचे उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.