बहुजन सत्ता संघर्ष आघाडी जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणूक लढविणार

Spread the love

वंचित, एमआयएम,मुस्लिम सेना,भीम आर्मी यांसह समविचारी संघटनांचा सहभाग

 

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ तालुक्यातील बहुजन, वंचित, शोषित, पीडित व अल्पसंख्यांक समाजाकडे सातत्याने राजकीय दुर्लक्ष होत असून निवडणुकीपुरतेच त्यांचा वापर केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर अन्यायाविरोधात एकत्रित लढा देण्यासाठी बहुजन सत्ता संघर्ष आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. या आघाडीच्या माध्यमातून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका ताकदीने लढविण्यात येणार असल्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली.आघाडीचे प्रमुख संदीप कांबळे, एमआयएमचे जिल्हाध्यक्ष इमरान सनदी व मुस्लिम सेनेचे समीर पटेल यांनी संयुक्तपणे ही माहिती दिली. वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, बहुजन समाज पार्टी, पूरग्रस्त सेवा समिती, भीम आर्मी, बी.आर.एस.पी., मुस्लिम सेना, ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटना, भीम कायदा, दलित पॅंथर, भीम आर्मी आझाद समाज पार्टी यांच्यासह इतर समविचारी सामाजिक व राजकीय संघटना या आघाडीत सहभागी झाल्या आहेत.यावेळी बोलताना वंचित बहुजन आघाडीचे शिरोळ तालुकाध्यक्ष संदीप कांबळे म्हणाले की, बहुजन सत्ता संघर्ष आघाडी कोणत्याही सत्तेच्या सौदेबाजीसाठी नसून संविधानाचे रक्षण, बहुजन समाजाचा स्वाभिमान आणि हक्काचे राजकारण केंद्रस्थानी आणण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. शिरोळ तालुक्यातील बहुजन समाजाला जाणीवपूर्वक डावलले जात असून याविरोधात आक्रमक आणि निर्णायक लढा उभारला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. एमआयएमचे जिल्हाध्यक्ष इमरान सनदी म्हणाले की, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आघाडीच्या माध्यमातून लढविण्यात येतील. जनहिताच्या सर्व प्रश्नांवर स्पष्ट भूमिका घेत सत्ताधाऱ्यांच्या बहुजनविरोधी धोरणांना जोरदार प्रतिउत्तर दिले जाईल. बहुजन समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकत्रित प्रयत्न करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.मुस्लिम सेनेचे समीर पटेल यांनी बहुजन समाजाच्या राजकीय ताकदीचे एकत्रीकरण हेच या आघाडीचे प्रमुख बळ असल्याचे सांगितले. शिरोळ तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची क्षमता या आघाडीत असून निवडणुकीत आपली ताकद दाखवून दिली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पूरग्रस्त सेवा समितीचे पांडुरंग गायकवाड यांनीही आपली भूमिका मांडली.ऑल इंडिया ओबीसी संघटनेचे डॉ. मेहबूब बागवान यांनी आभार मानले. यावेळी जीवन आवळे, गौतम कांबळे, मच्छिंद्र कांबळे, सलमान नाईकवाडे, अमोल मोहिते यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment

error: Content is protected !!