नागांवमधून तीन महिन्यांपूर्वी चोरीला गेलेली दुचाकी सापडली विहिरीत

Spread the love

पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे 

हातकणंगले तालुक्यातील नागांव येथे तीन महिन्यांपूर्वी चोरीला गेलेली दुचाकी अखेर एका शेतातील विहिरीत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.जनावरांना वैरण आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याची मोटारसायकल चोरीस गेल्याची घटना रत्नागिरी – नागपूर महामार्गालगत घडली होती.तब्बल तीन महिन्यांनंतर ती दुचाकी विहिरीच्या तळाशी सापडल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.नागांव येथील सतीश चव्हाण हे शेतकरी काही महिन्यांपूर्वी रत्नागिरी – नागपूर महामार्गावरील कुडीच्या माळ परिसरात जनावरांसाठी वैरण आणण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी आपली मोटारसायकल रस्त्याच्या कडेला लावली होती.मात्र परत आल्यानंतर त्यांची दुचाकी तेथे आढळून आली नाही.अज्ञात चोरट्याने किंवा माथेफिरू व्यक्तीने दुचाकी चोरून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.दुचाकीचा सर्वत्र शोध घेण्यात आला,मात्र ती सापडली नाही.अखेर सतीश चव्हाण यांनी शिरोली पोलिस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली होती.दरम्यान,आज शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी विहिरीतील पाण्याचा उपसा सुरू असताना पाण्याची पातळी कमी झाली. त्यावेळी विहिरीच्या तळाशी एक दुचाकी असल्याचे स्वप्निल चव्हाण आणि सुरज चव्हाण यांच्या निदर्शनास आले.त्यांनी तातडीने आजूबाजूच्या नागरिकांना बोलावून पाहणी केली असता,ती दुचाकी तीन महिन्यांपूर्वी चोरीला गेलेली सतीश चव्हाण यांचीच असल्याचे स्पष्ट झाले.यानंतर सतीश चव्हाण यांच्या गल्लीतील सुरज चव्हाण,बबलू भोसले, प्रदीप चव्हाण आणि रितेश चव्हाण यांनी विहिरीत उतरून दुचाकी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.मात्र दुचाकी खोल पाण्यात व चिखलात रुतल्याने ती बाहेर काढणे शक्य झाले नाही.अखेर क्रेन बोलावण्यात आली आणि क्रेनच्या सहाय्याने दुचाकी बाहेर काढण्यात यश आले.तीन महिन्यांपासून विहिरीत पडून असल्यामुळे दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या घटनेमुळे अज्ञात व्यक्तीने दुचाकी चोरी करून ती थेट विहिरीत ढकलल्याचा संशय बळावला असून पोलिसांकडून पुढील तपास होण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!