आमदार यड्रावकरांचा मास्टरस्ट्रोक, शिरोळ तालुक्यात काँग्रेसला मोठा धक्का

Spread the love

गणपतराव पाटील व राजू शेट्टी यांनी मनात आणलं तर शिरदवाड पं.स मधून सौ मनिषा कदम बिनविरोध होतील पण….

शिरोळ / प्रतिनिधी 

शिरोळ तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी विरोधकांना कोंडीत पकडण्यास सुरुवात केल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. राजर्षी शाहू विकास आघाडीकडून काँग्रेस नेते गणपतराव पाटील यांच्या श्री दत्त साखर कारखान्याचे संचालक रणजित कदम यांच्या पत्नी सौ.मनिषा रणजित कदम यांना अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केल्याने काँग्रेसच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे.सौ.मनिषा कदम या सहकारमहर्षी,माजी खासदार तथा श्री दत्त साखर कारखान्याचे संस्थापक स्वर्गीय दत्ताजीराव कदम यांच्या नातसून असून त्या शिरदवाड पंचायत समिती मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.स्व.कदम आण्णांनी शिरोळ तालुक्याच्या जडणघडणीत मोलाची भूमिका बजावली असून त्यांचा विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी आपण ही निवडणूक लढवत असल्याचे कदम समर्थकांकडून सांगितले जात आहे.शिरोळ तालुक्यावर कदम घराण्याचे उपकार मोठे असल्याची भावना आजही नागरिकांमध्ये दिसून येते.पाणीपुरवठा संस्था उभारून हजारो एकर जमीन सिंचनाखाली आणणे,सेवा सोसायट्या,बँका, पतसंस्था स्थापन करणे तसेच साखर कारखान्याच्या माध्यमातून हजारो कुटुंबांना रोजगार आणि शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याचे कार्य स्व.दत्ताजीराव कदम यांनी केले आहे.त्यामुळे शिरदवाड मतदारसंघात कदम कुटुंबीयांविषयी सहानुभूती असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.दरम्यान, काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील व माजी खासदार राजू शेट्टी यांनी मनात आणल्यास शिरदवाड पंचायत समितीची निवडणूक बिनविरोध होऊ शकते,अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली पंचायत समिती निवडणूक बिनविरोध झाल्यास आमदार यड्रावकर यांचे नाव राज्यभरात चर्चेत येईल त्यांचे वर्चस्व वाढेल आणि त्याचा परिणाम इतर मतदारसंघांवर होईल,या भीतीपोटी काँग्रेस नेते गणपतराव पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी बिनविरोध प्रक्रिया होऊ देणार नाहीत असे मत राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त होत आहे.शिरोळ तालुक्यातील या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. अर्ज माघारीनंतर बिनविरोध होणार की निवडणूक लागणार येत्या दोन दिवसात स्पष्ट होणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!