गणेशवाडीत माघी गणेश जयंती उत्साहात साजरी

Spread the love

गणेशवाडी / प्रतिनिधी 

गणेशवाडी (ता.शिरोळ) येथील पुरातन श्री गणेश मंदिरात माघी गणेश जयंती हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात आणि विविध धार्मिक कार्यक्रमांच्या साक्षीने उत्साहात साजरी करण्यात आली. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.या निमित्ताने पहाटे ५.३० वाजता नित्यपूजा पार पडली.सकाळी ६ ते ९ या वेळेत श्रींचा अभिषेक करण्यात आला. सकाळी ९ वाजता संकल्प सोहळा झाला. त्यानंतर एकादशणी व श्रीं ची अलंकार महापूजा संपन्न झाली.सकाळी ११ वाजता किर्लोस्करवाडी येथील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. सौ.भक्ती देशपांडे यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. त्यांच्या कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.दुपारी १२.३० वाजता हजारो श्रीभक्तांच्या उपस्थितीत श्री गणेशांचा जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला. जन्मकाळ सोहळ्यानंतर सुंटवडा व तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. सायंकाळी ५ वाजता गणेशवाडी येथील संभाजी घोरपडे व सहकाऱ्यांचे भक्तीमय भजन झाले.सायंकाळी ७.३० वाजता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोल्हापूर विभाग सहसंघचालक भगतराम छाबडा यांच्या हस्ते, मान्यवर व हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाआरती झाली. मंदिराचे पुजारी अमोघ श्रीधर काणे व ऋषिकेश काणे यांनी सर्व धार्मिक विधी विधिवत पार पाडले.माघी गणेश जयंतीनिमित्त मंदिराभोवती नृसिंहवाडी येथील ‘आविष्कार रांगोळी ग्रुप’च्या वतीने आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. सर सेनापती संताजीराव घोरपडे प्रतिष्ठानतर्फे संपूर्ण मंदिराची रंगीबेरंगी फुले, फुगे व आकर्षक विद्युत रोषणाईने सजावट करण्यात आली होती.दिवसभरात गणेशवाडीसह पंचक्रोशी, सांगली, कोल्हापूर तसेच कर्नाटक राज्यातील सुमारे दहा हजारांहून अधिक भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी मोठी गर्दी होती.सर्व कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी व भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी अतुल पटवर्धन, प्रमोद शेंडगे, रोहित वास्कर, प्रतीक निकम, शुभम जगताप, परशुराम कुंभार, विनायक कुंभार, श्री कल्लोळे,अजय बसर्गे,अक्षय मडीवाळ, ओंकार देवताळे यांच्यासह स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. गणेशवाडी माळभाग येथील अचानक मित्र मंडळातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याचा हजारो भाविकांनी लाभ घेतला.

Leave a Comment

error: Content is protected !!