इचलकरंजी / प्रतिनिधी
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौर पदाचे आरक्षण जाहीर झाल्याने स्थानिक राजकारणाला वेग आला आहे.यामध्ये नव्याने स्थापन झालेल्या इचलकरंजी महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर पदासाठी ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.त्यामुळे शहराच्या पहिल्या महापौरपदी कोण विराजमान होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. इचलकरंजी महानगरपालिका अस्तित्वात आल्यानंतर प्रथमच महापौर निवड होणार असल्याने ही निवड ऐतिहासिक ठरणार आहे.ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित झाल्यामुळे ओबीसी समाजातील इच्छुक उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.राजकीय पक्षांकडूनही संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू झाली असून,विविध गटांमध्ये हालचालींना वेग आला आहे.ओबीसी पुरुष गटातून अभिषेक वाळवेकर, तानाजी पोवार, विठ्ठल चोपडे, सतीश मुळीक, सुशांत कलागते, प्रदीप धुत्रे, नितेश उर्फ गोट्या पवार आणि उदय धातूंडे यांची नावे चर्चेत आहेत.या सर्वांनी यापूर्वी सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय भूमिका बजावली असून,पक्षीय पातळीवर त्यांची दखल घेतली जात आहे.कोणत्या उमेदवाराला पक्षाचा अधिकृत पाठिंबा मिळतो, यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.तर दुसरीकडे ओबीसी महिला गटातून रूपा बुगड,ध्रुवती दळवाई आणि सपना भिसे यांच्या नावांची जोरदार चर्चा आहे.महिलांना संधी दिली गेल्यास इचलकरंजीला पहिली महिला महापौर मिळण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. यामुळे महिला नेतृत्वाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.आगामी काळात पक्षीय बैठका,आघाड्या आणि रणनीती यामुळे राजकीय वातावरण अधिक तापणार आहे. इचलकरंजीच्या विकासाची दिशा ठरवणारा पहिला महापौर कोण ठरणार,याकडे संपूर्ण शहराचे लक्ष केंद्रित झाले आहे.