आई वडिलांच्या कष्टाचे पांग फेडलं,गवंडी कारागिराचा मुलगा सैन्य दलात भरती; ओंकारची जिद्द तरुणांसाठी प्रेरणादायी

Spread the love

शिरोळ / प्रतिनिधी 

प्रतिकूल आर्थिक परिस्थिती,मर्यादित साधनसंपत्ती आणि सततच्या संघर्षावर मात करत शिरोळ येथील गवंडी काम करणारे मुकुंद माळवे यांचा मुलगा ओंकार माळवे याने पहिल्याच प्रयत्नांत भारतीय सेनेत निवड होऊन आपल्या आई वडिलांच्या कष्टाचे चीज करून कुटुंबासह संपूर्ण परिसराचा अभिमान उंचावला आहे. कठोर परिश्रम,जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मिळवलेले हे यश अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. मूळचे बेळगाव जिल्ह्यातील रामपूर गावचे रहिवासी असलेले मुकुंद माळवे हे उदरनिर्वाहासाठी सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी नृसिंहवाडी (ता.शिरोळ) परिसरात आले.गवंडी काम करून त्यांनी कुटुंबाचा चरितार्थ चालवला.अत्यंत साध्या परिस्थितीत वाढलेल्या ओंकारने लहानपणापासूनच भारतीय सेनेत जाण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते.घरची परिस्थिती हलाखीची असतानाही आई-वडिलांनी मुलाच्या स्वप्नांना कधीही मर्यादा घातल्या नाहीत.ओंकारने सुट्टीच्या दिवशी वडीलांना बांधकाम कामात हातभार तसेच शिक्षणासोबतच शारीरिक तंदुरुस्तीवर विशेष भर दिला.सकाळी पहाटे धावणे,संध्याकाळी नियमित व्यायाम आणि रात्री अभ्यास असा कठोर दिनक्रम त्याने सातत्याने पाळला.अनेक अडचणी,अपयशाचे क्षण आणि थकवा असूनही त्याने कधीही हार मानली नाही.शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन, कुटुंबाचे पाठबळ आणि स्वतःवरील विश्वास या बळावर त्याने तयारी सुरू ठेवली.वडील मुकुंद माळवे,आई लक्ष्मी माळवे तसेच कुटुंबातील सर्व सदस्यांनी ओंकारला मानसिक बळ दिले.त्याचा मोठा भाऊ विशाल माळवे सध्या होमगार्ड म्हणून सेवा बजावत असून, त्यालाही पोलीस भरती होण्याची तीव्र इच्छा आहे.दोन भावांची देशसेवेची ही वाटचाल परिसरातील तरुणांसाठी आदर्श ठरत आहे.भारतीय सेनेच्या भरती प्रक्रियेत ओंकारने लेखी परीक्षा,शारीरिक चाचणी आणि मुलाखत हे सर्व टप्पे यशस्वीरीत्या पार केले.अखेर भारतीय सेनेत त्याची निवड झाल्याची बातमी मिळताच माळवे कुटुंबासह नरसीवाडी व शिरोळ परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.मित्र,नातेवाईक,ग्रामस्थ, शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.आपल्या यशाबद्दल बोलताना ओंकार माळवे म्हणाला,या यशाचे संपूर्ण श्रेय माझे आई-वडील, शिक्षक आणि माझ्या मेहनतीला जाते.परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वप्नांवर विश्वास ठेवून सातत्याने प्रयत्न केले तर यश नक्की मिळते.गवंडी कामगाराच्या मुलाने भारतीय सेनेत मिळवलेले हे यश केवळ वैयक्तिक नसून समाजातील सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांना नवी दिशा देणारे आहे.ओंकार माळवेची ही यशोगाथा मेहनत,जिद्द आणि चिकाटी या मूल्यांची ताकद अधोरेखित करणारी ठरत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!