मोटरसायकल – टेम्पोची धडक; एकुलत्या एक मुलाचा दुर्दैवी अंत, स्पर्धा परीक्षेच्या स्वप्नांचा चुराडा

Spread the love
कोल्हापूर / प्रतिनिधी 
कोल्हापूर – गगनबावडा मुख्य मार्गावर खुपिरे गावाजवळ मंगळवारी (दि. २०) रात्री घडलेल्या भीषण अपघातात दुचाकी व मालवाहतूक टेम्पोची समोरासमोर जोरदार धडक होऊन एका तरुणाचा करुण अंत झाला.या अपघातात दुसरा तरुण गंभीर जखमी झाला असून या घटनेमुळे खुपिरे गावासह परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.खुपिरे (ता. करवीर) येथील सौरभ संजय सुतार (वय २४) आणि त्याचा मित्र आकाश सर्जेराव सुतार (वय २४, रा. शिंदेवाडी) हे दोघे कुंभी – कासारी साखर कारखान्यावरून दुचाकीने खुपिरे गावाकडे परतत होते. त्याचवेळी कोल्हापूरहून गोव्याच्या दिशेने जाणारा मालवाहतूक करणारा छोटा टेम्पो वेगात जात होता.रात्री साडेअकराच्या सुमारास खुपिरे – वाकरे हद्दीतील एका खासगी पेट्रोल पंपासमोर दुचाकी आणि टेम्पो यांची समोरासमोर जोरदार धडक झाली.या अपघातात सौरभ सुतार याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली,तर आकाश सुतार हा गंभीर जखमी झाला.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ १०८ रुग्णवाहिकेला पाचारण करून दोघांनाही उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी सौरभ यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. आकाश याच्यावर सध्या उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.सौरभ सुतार हा अभ्यासू आणि होतकरू तरुण असून तो स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. वडील सुतारकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. एकुलत्या एक मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याने सुतार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आई – वडील व भावाचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले.घटनेची माहिती पोलीस पाटील सविता शिवाजी गुरव यांनी करवीर पोलिसांना दिली असून अपघाताची नोंद करण्यात आली आहे.करवीर पोलीस पुढील तपास करीत आहेत.या दुर्दैवी घटनेमुळे खुपिरे गावात शोककळा पसरली असून नातेवाईक,मित्रमंडळी आणि ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!