इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी शहरात माथाडी व असंरक्षित कामगार मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली.या बैठकीत माथाडी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत तसेच मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मंडळाच्या अध्यक्षा तथा सहायक कामगार आयुक्त श्रीमती जानकी भोईटे उपस्थित होत्या.यावेळी मार्गदर्शन करताना श्रीमती जानकी भोईटे यांनी माथाडी कामगारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी माथाडी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. मंडळामार्फत माथाडी व असंरक्षित कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देताना त्यांनी आरोग्य सुविधा, विमा योजना, शैक्षणिक सहाय्य, आर्थिक मदत तसेच सामाजिक सुरक्षेच्या उपाययोजनांवर भर देण्यात येत असल्याचे स्पष्ट केले.या योजनांचा लाभ अधिकाधिक गरजू व कष्टकरी कामगारांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व संबंधितांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.बैठकीत मंडळाचे सदस्य डॉ.अरविंद माने यांनी आपले मनोगत व्यक्त करताना माथाडी कायद्याच्या सक्षम आणि प्रभावी अंमलबजावणीसाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. माथाडी कायद्याचा लाभ प्रत्यक्षात गरजू आणि मेहनती हमाल कामगारांपर्यंत पोहोचावा, यासाठी योग्य त्या उपाययोजना राबविण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच कामगारांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी मंडळ सदैव तत्पर राहील, असेही त्यांनी नमूद केले.या बैठकीदरम्यान समितीचे प्रतिनिधी कृष्णात पाटील व कुंदन शिंदे यांचा मंडळाचे सचिव तथा सरकारी कामगार अधिकारी मा. पुरी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. बैठकीस इचलकरंजी परिसरातील विविध मान्यवर, कामगार प्रतिनिधी व मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीस सचिन जाधव, रहीम जामदार, युवराज लाखे, अमरजीत कोगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.बैठकीमुळे माथाडी कामगारांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा घडून आली असून, भविष्यातील कामकाजासाठी दिशा मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.