शिरोळ / प्रतिनिधी
शिरोळ शहरातील नागरिकांच्या दैनंदिन अडचणी थेट प्रशासनापर्यंत पोहोचाव्यात, या उद्देशाने शहरातील जागरूक नागरिकांनी ‘शिरोळ नगरपरिषद समस्या’ नावाचा व्हॉट्सॲप ग्रुप सुरू केला होता.या ग्रुपमध्ये शिरोळ शहरातील सर्व प्रभागांतील नागरिकांसह नगरपरिषदेतील विविध विभागांचे अधिकारी सहभागी आहेत.गेल्या एक वर्षापासून या ग्रुपच्या माध्यमातून शहरातील स्वच्छता,पाणीपुरवठा,रस्ते, गटारी,पथदिवे यासह अनेक मूलभूत समस्यांची माहिती प्रशासनापर्यंत पोहोचवली जात होती.या कालावधीत काही समस्या सोडवण्यात प्रशासनाला यश आले,मात्र काही प्रश्न वेळेत न सुटल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती.प्रशासकीय कारभार सुरू असल्याने थेट लोकप्रतिनिधी नसल्यामुळे अनेक नागरिकांनी आपली समस्या मांडण्यास मर्यादा ठेवली होती.परिणामी काही प्रश्न प्रलंबित राहिले होते.अलीकडेच शिरोळ नगरपरिषदेची निवडणूक पार पडून नवनिर्वाचित नगरसेवकांनी पदभार स्वीकारल्यानंतर उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव यांच्या नेतृत्वाखाली अवघ्या एका महिन्यात ‘शिरोळ नगरपरिषद समस्या’ ग्रुपवरील तब्बल ९० टक्के समस्या मार्गी लागल्याचे चित्र दिसून येत आहे.विशेषतः स्वच्छतेचा प्रश्न,अपुरा पाणीपुरवठा,कचरा व्यवस्थापन,गटारी साफसफाई यासारख्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्यात येत आहे.ग्रुपवर एखादी समस्या मांडल्यानंतर संबंधित नगरसेवक व अधिकारी त्वरित दखल घेत असल्याने कामे वेगाने मार्गी लागत आहेत.त्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.या उल्लेखनीय कामगिरीबद्दल शिरोळ शहरातील नागरिकांनी शिव – शाहू आघाडी पुरस्कृत यादव पॅनलचे नगराध्यक्षा सौ योगिता कांबळे, उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव तसेच सर्व नगरसेवकांचे आभार मानले आहेत.येणाऱ्या काळात शिरोळ शहरातील नागरिकांना दर्जेदार व मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी शिव – शाहू आघाडी कटिबद्ध असून निवडणुकीदरम्यान दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्यात येतील,असा विश्वासही नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वयामुळे शिरोळ शहराचा विकास अधिक गतीने होईल,अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे.