अर्ज दाखल करण्याचा आज अंतिम दिवस; निवडणूक यंत्रणेने सतर्क राहावे – जिल्हाधिकारी अमोल येडगे

Spread the love

कोल्हापूर / प्रतिनिधी 

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा आज बुधवार, दि. २१ जानेवारी हा अंतिम दिवस असल्याने कोणत्याही स्तरावर तांत्रिक अडथळा, गैरसमज किंवा गोंधळ निर्माण होऊ नये, यासाठी निवडणूक यंत्रणेने आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीद्वारे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रियेचा व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, महसूल उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी यांची प्रमुख उपस्थिती होती.नामनिर्देशनाचा आजचा दिवस अंतिम असल्याने संभाव्य गर्दी लक्षात घेऊन संबंधित सर्व निवडणूक कार्यालये सकाळी ९ वाजल्यापासून कार्यान्वित ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. दुपारी ३ वाजेपर्यंतच अर्ज स्वीकारले जातील, त्यामुळे या वेळेची माहिती उमेदवारांना वेळोवेळी उद्घोषणेद्वारे द्यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी अर्ज स्वीकारण्याच्या संपूर्ण कामकाजाचे तसेच महत्त्वाच्या घोषणांचे व्हिडिओ चित्रीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. निवडणूक कामकाजासाठी नियुक्त सर्व पथकांनी पूर्णवेळ सतर्क राहावे, अशी सूचनाही देण्यात आली.कायदा व सुव्यवस्थेबाबत पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी पोलीस प्रशासनाच्या हालचालींसाठी अतिरिक्त वाहने तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्यावर भर देत आचारसंहिता भंगाच्या तक्रारी विहित नमुन्यात अचूकपणे सादर करण्याचे आदेश दिले.जिल्ह्यातील सर्व निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आजच्या अंतिम दिवसासाठी आवश्यक तयारी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना दिली.

Leave a Comment

error: Content is protected !!