शिरोळ / प्रतिनिधी
देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल प्रताप उर्फ बाबा पाटील यांचा शिव-शाहू आघाडी प्रणित यादव पॅनेलकडून शिरोळ नगरपालिकेत सत्कार करण्यात आला. या खास समारंभाचे आयोजन नगरपालिकेच्या मुख्य हॉलमध्ये पार पडले.सत्कार समारंभात शिरोळ शहराचे उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव बोलताना म्हणाले, शिरोळ शहराच्या विकासात प्रताप उर्फ बाबा पाटील यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. त्यांनी गावातील सर्वसामान्यांच्या समस्या नेहमी प्राधान्याने मांडल्या आहेत. शिव-शाहू आघाडी प्रणित यादव पॅनेलच्या प्रमुख नेत्यांच्या नेतृत्त्वाखाली प्रभाग क्रमांक एक ते दहा मधून सर्व नगरसेवक निवडून येण्यासाठी केलेले प्रयत्न निर्णायक ठरले.सत्कार कार्यक्रमापूर्वी प्रताप उर्फ बाबा पाटील यांच्या निवासस्थानी शिव-शाहू आघाडी प्रणित यादव पॅनेलचे सर्व उमेदवार उपस्थित होते. सर्व महिला नगरसेवकांनी पारंपरिक औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर हलगीच्या निनादात व वाजत-गाजत मिरवणूक काढत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवक प्रताप उर्फ बाबा पाटील यांना नगरपालिकेत घेऊन गेले.नगरपालिकेत झालेल्या समारंभात दरगु गावडे, बी. जी. माने, अविनाश कांबळे, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश गावडे, आनंदराव गावडे, मानसिंग पाटील, रावसाहेब माने यांची प्रमुख उपस्थिती होती. नगराध्यक्ष योगिता कांबळे, उपनगराध्यक्ष पृथ्वीराजसिंह यादव आणि सर्व नगरसेवकांच्या हस्ते प्रताप उर्फ बाबा पाटील यांचा फेटा, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी प्रताप उर्फ बाबा पाटील यांनी आपल्या निवडी नंतर मिळालेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्यांनी पंचगंगा साखर कारखाना आणि शिरोळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांशी मिळून काम करण्याचे आश्वासन दिले. सामाजिक, सहकार व नगरविकास या तिन्ही क्षेत्रात समन्वय साधून प्रामाणिक प्रयत्न केले जातील, असे ते म्हणाले.कार्यक्रमाचे आभार नगरसेवक सचिन शिंदे यांनी मानले. नगरसेवक शरद उर्फ बापू मोरे, दीपक भाट, ओंकार माने गावडे, निलेश गावडे, उल्हास आवळे, राहुल कोळी, सौ. कल्पना काळे, सौ. अनिता संकपाळ, सौ. अनुराधा गुरव, सौ. विदुला यादव, सौ. दिपाली फल्ले, सौ. रेखा कोरे, सौ. सुवर्णा कांबळे, पद्मसिंह पाटील, रुपेश मोरे, विठ्ठल पाटील, धनाजी पाटील नरदेकर, परवेज मिस्त्री यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.