पुलाची शिरोली प्रतिनिधी / कुबेर हंकारे
पुणे – बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पुलाची शिरोली येथील मदरसा परिसरात मंगळवारी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराचा भीषण अपघात झाला.वेगावर नियंत्रण न राहिल्याने रस्त्याच्या कामासाठी ठेवण्यात आलेल्या महामाय सिमेंटच्या भल्या मोठ्या बॅरीकेटवर दुचाकी जाऊन आदळली.अपघातात दुचाकीस्वार उडून जोरात रस्त्यावर आपटला. मात्र त्याच्या डोक्यावर हेल्मेट असल्यामुळे त्याचे प्राण थोडक्यात वाचले.या अपघातात गडहिंग्लज तालुक्यातील निलजी (ता. गडहिंग्लज) येथील संतोष हिरगोंडा पाटील (वय ३५) हे जखमी झाले.सुदैवाने गंभीर इजा टळली असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.मात्र त्यांच्या हिरो होंडा स्प्लेंडर दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले.विशेष म्हणजे,पुणे – बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील याच वळणावर गेल्या पंधरा दिवसांतील हा दुसरा अपघात आहे. यापूर्वी कोल्हापूर येथील एक वयोवृद्ध नागरिक नागाव फाटा येथील आपल्या दुकानाकडे कारने जात असताना दिशादर्शक फलक नसल्यामुळे वळणाचा अंदाज न आल्याने त्यांच्या कारची महाकाय सिमेंटच्या बॅरीकेटवर जोरदार धडक झाली होती.त्या वेळी कारमधील एअरबॅग्स वेळेवर उघडल्यामुळे त्यांचे प्राण वाचले होते.सध्या पुणे – बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे.अनेक ठिकाणी रस्ता पर्यायी मार्गाने वळवण्यात आला आहे.मात्र या ठिकाणी आवश्यक ते दिशादर्शक फलक, सूचनाफलक,रिफ्लेक्टर किंवा इशारा देणारी व्यवस्था करण्यात आलेली नाही. परिणामी वाहनचालकांना अचानक वळण किंवा अडथळ्यांचा अंदाज येत नसून अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.रस्त्याचे काम कसेही असो,मात्र नागरिकांचे जीव अशा प्रकारे हकनाक जाऊ नयेत,अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.या गंभीर परिस्थितीची प्रशासनाने तातडीने दखल घेऊन महामार्गावर योग्य दिशादर्शक फलक, सुरक्षितता उपाययोजना व वेगमर्यादेची अंमलबजावणी करावी,अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिक व वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.