खेलो इंडिया स्पर्धेत जयसिंगपूरच्या तन्वी कुराडे हिचे सुवर्णयश

Spread the love

जयसिंगपूर / प्रतिनिधी 

राजस्थानमधील कोटा येथे नुकत्याच पार पडलेल्या खेलो इंडिया आंतरविद्यापीठीय क्रीडा स्पर्धेत जयसिंगपूर शहराची कन्या कु.तन्वी चंद्रकांत कुराडे हिने तलवारबाजी (फेन्सिंग) या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे.जयसिंगपूर रेल्वे स्टेशन नजिक असलेल्या ग्रीन व्हॅली अपार्टमेंटमध्ये स्थायिक असलेली तन्वी सध्या पंजाब येथील गुरुकाशी विद्यापीठात शिक्षण घेत आहे.या स्पर्धेमध्ये देशभरातील विविध नामांकित विद्यापीठांमधील खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये गुरुकाशी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कु. तन्वी कुराडे हिने अमृतसर येथील गुरुनानक देव युनिव्हर्सिटीच्या खेळाडूसोबत अंतिम फेरीत अत्यंत चुरशीचा व रोमहर्षक सामना खेळला. उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, संयम आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तन्वीने अंतिम सामन्यात विजय मिळवत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. या विजयामुळे गुरुकाशी विद्यापीठाबरोबरच जयसिंगपूर शहराचाही नावलौकिक वाढला आहे.तन्वी कुराडे हिने यापूर्वीही पंजाब व जम्मू-काश्मीर येथे झालेल्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्ण व रौप्य पदके पटकावून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. सातत्यपूर्ण मेहनत, शिस्तबद्ध सराव आणि जिद्दीच्या जोरावर तिने ही यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे.या यशामागे तिची आई सुवर्णा कुराडे, वडील चंद्रकांत कुराडे तसेच गुरुकाशी विद्यापीठाच्या क्रीडा विभागातील प्रशिक्षक व मार्गदर्शकांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. तन्वीचे वडील सध्या जयसिंगपूर रेल्वे खात्यात पॉइंटसमन म्हणून सेवा बजावत आहेत.तन्वी सध्या गुरुकाशी विद्यापीठात वाणिज्य शाखेच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे.भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याचा मानस असल्याचे तन्वीने सांगितले असून, खेळासोबतच उच्च पदावर पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम करणार असल्याचा निर्धार तिने व्यक्त केला आहे. तलवारबाजीमध्ये सुवर्णपदक मिळाल्याने तिच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून जयसिंगपूरवासीयांना तिच्या या यशाचा अभिमान वाटत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!