शिरोळ / प्रतिनिधी
हेरवाड येथील आदर्श शिक्षक आणि निर्भीड,अभ्यासू पत्रकार म्हणून ओळख असलेले मा.दिलीप शिरढोणे सर म्हणजे विचारांची चालती-बोलती दीपशिखा आहेत.विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देणारा संवेदनशील शिक्षक आणि समाजातील ज्वलंत प्रश्नांना निर्भयपणे वाचा फोडणारा पत्रकार म्हणून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.वाणी आणि शब्दांमध्ये सत्य,तर लेखणीत प्रामाणिकपणा हेच त्यांच्या जीवनाचे खरे शस्त्र असून याच बळावर त्यांनी समाजासाठी अविरत कार्य केले आहे.शिक्षक म्हणून कार्य करताना दिलीप शिरढोणे सरांनी शिक्षणाला केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित ठेवले नाही. शिक्षणातून माणूस घडवताना समाजमन घडवण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी सातत्याने केले.विद्यार्थ्यांमध्ये शिस्त,कर्तव्यभावना, सामाजिक जाणिवा आणि माणुसकी रुजवण्यावर त्यांचा नेहमीच भर राहिला.शाळेतील अध्यापनाबरोबरच शाळाबाह्य मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात यावीत यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांपर्यंत पोहोचणे,त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवणे, हे त्यांचे ध्येय राहिले आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रातही दिलीप शिरढोणे सरांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सत्तेपुढे न झुकणारी लेखणी,अन्यायाविरोधात ठामपणे उभी राहणारी भूमिका आणि सामान्य माणसाच्या बाजूने बोलण्याचे धाडस यामुळे ते समाजाचे खरे प्रहरी ठरले आहेत.न्यायाची चाड आणि अन्यायाची चीड घेऊन समाजाप्रति काम करणारे हे व्यक्तिमत्त्व समाजप्रिय आहे. गोरगरिबांचा आवाज बनून त्यांनी अनेक दुर्लक्षित प्रश्न प्रकाशात आणले. समाजातील उपेक्षित घटक,शोषित वर्ग,कामगार,शेतकरी आणि सामान्य नागरिक यांच्या प्रश्नांना त्यांनी आपल्या लेखणीतून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला.“काम कमी आणि चर्चा डोंगराएवढी”अशी वृत्ती त्यांना कधीच जमली नाही.शांतपणे,प्रामाणिकपणे आणि सातत्याने काम करत राहणे हा त्यांचा स्वभाव आहे.खरेपणा जिवंत राहिला पाहिजे,सामान्य माणसाला बळ मिळाले पाहिजे,दुर्लक्षित व उपेक्षित घटकाला आधार देणारी चळवळ उभारली पाहिजे,या विचारातूनच त्यांचा लेखनप्रपंच आकार घेतो. समाज बदलायचा असेल तर आधी विचार बदलले पाहिजेत,ही त्यांची ठाम भूमिका आहे.सामाजिक,शैक्षणिक आणि पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दिलीप शिरढोणे सर यांना विविध सेवाभावी संस्था,सामाजिक संघटना व व्यक्तींच्या वतीने जिल्हा व राज्य पातळीवर अनेक पुरस्कार व सन्मान प्राप्त झाले आहेत.मात्र, कार्यातून मिळालेले पद किंवा सन्मान हे मिरवण्यासाठी नसून समाजाच्या कल्याणासाठी पुन्हा-पुन्हा गिरवण्यासाठी असतात,अशी विचारधारा त्यांनी समाजात रुजवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे.पुरस्कारांपेक्षा काम महत्त्वाचे आणि प्रसिद्धीपेक्षा प्रामाणिकपणा श्रेष्ठ,हा संदेश त्यांच्या वर्तनातून कायम मिळतो.कोणताही गाजावाजा न करता समाजासाठी संस्कारांची शिदोरी घेऊन काम करणे,माणूसपण जपण्याचे संस्कार पेरणे आणि ज्ञानमंदिरातून सामाजिक एकता,समता व बंधुतेचे विचार रुजवणे,हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य आहे. शिक्षक आणि पत्रकार या दोन्ही भूमिकांतून त्यांनी समाजाला दिशा देण्याचे काम केले असून त्यांचे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.मा.दिलीप शिरढोणे सर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या या बहुआयामी आणि समाजोपयोगी कर्तृत्वाला मनःपूर्वक सॅल्यूट करत मित्रपरिवार, विद्यार्थी,वाचक,सहकारी आणि समाजातील विविध स्तरांतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.मित्राला मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना दीर्घायुष्य,उत्तम आरोग्य आणि पुढील सामाजिक, शैक्षणिक व पत्रकारिता कार्यासाठी अधिक बळ मिळो,हीच सदिच्छा.