शिरोळ / प्रतिनिधी
निवडणुका जवळ आल्या की अनेक कार्यकर्ते आणि उमेदवार पक्ष बदलतात, कुठे प्रवेश तर कुठून बाहेर पडण्याचे राजकारण सुरू होते. मात्र आमची आघाडी ही सत्तेसाठी नाही तर ठाम विचारांवर चालणारी आहे, अशी खोचक प्रतिक्रिया देत माजी खासदार राजू शेट्टी यांनी स्वाभिमानीतून बाहेर पडलेल्यांना डिवचले.येत्या काही दिवसांत भाजपसह इतर पक्षांतील नाराज उमेदवार आमच्या आघाडीच्या झेंड्याखाली निवडणूक लढवताना दिसतील, असा दावाही त्यांनी केला.पत्रकार परिषदनंतर माध्यमांशी बोलताना शेट्टी म्हणाले की, सध्या राज्यातील राजकारण पूर्णपणे संधीसाधूपणावर आधारित झाले आहे. निवडणूक आली की विचार, धोरणे आणि जनतेचे प्रश्न बाजूला ठेवून केवळ तिकीट आणि सत्तेसाठी पक्षांतर केले जाते.मात्र शेतकरी,कष्टकरी,कामगार आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेणारी आमची आघाडी आहे.ते पुढे म्हणाले,भाजप आणि इतर काही पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आहे. अनेक निष्ठावान कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवारांना डावलले जात आहे.त्यामुळे हे नाराज चेहरे पर्याय शोधत असून, आमची आघाडी त्यांना विश्वासार्ह आणि विचारप्रधान वाटत आहे.येत्या काही दिवसांत याबाबत चित्र स्पष्ट होईल,असेही त्यांनी सूचित केले. सरकारच्या धोरणांवर टीका करताना शेट्टी म्हणाले की, महागाई, शेतमालाला मिळणारे अपुरे दर, बेरोजगारी आणि ग्रामीण भागातील प्रश्नांकडे सत्ताधारी पक्षांचे दुर्लक्ष झाले आहे. केवळ घोषणा आणि जाहिरातींवर सरकार चालवले जात असून,जमिनीवरील वास्तव वेगळे आहे.आगामी निवडणुकीत जनतेने विचारांच्या पायावर उभ्या असलेल्या आघाडीला साथ द्यावी,असे आवाहन करत शेट्टी यांनी सांगितले की, ही लढाई सत्तेची नसून जनहिताची आहे. जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांची ताकद हीच आमची खरी भांडवलं असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.